Pune : कलापिनी साहित्य मंचाच्या वतीने ‘मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : मराठी सहित्यात आपल्या तळपत्या लेखणीने (Pune) साहित्याचे सर्व प्रकार हाताळणारे सिद्धहस्त लेखक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून जीवनाच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला मार्गदर्शन करतात. मानवी भाव भावनांचे मनोहारी चित्रण त्यांच्या साहित्यात अनुभवयाला मिळते. पुढच्या पिढीने मराठीतील साहित्याचे वाचन करून समृद्ध होणे गरजेचे आहे.” असे मत प्रा. जयंत जोर्वेकर यांनी व्यक्त केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कलापिनी सांस्कृतिक केंद्रात, कलापिनी साहित्य मंचाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, श्रीकुष्ण मुळे आणि कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते. नाट्यछटा, एकपात्री अभिनय, कविता, नृत्य, समर गीत अशा साहित्यातील विविध प्रकारांनी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला.

एकपात्री कलाकार परिषद आणि निळू फुले कला अकादमीच्या वतीने फक्त (Pune) महिलांसाठी एकपात्री अभिनय स्पर्धा श्यामल करंडक घेण्यात आली. यात अनघा बुरसे या कलापिनीच्या ज्येष्ठ सदस्याला द्वितीय क्रमांक मिळाला. बुरसे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

डॉ. अश्विनी परांजपे आणि प्राची गुप्ते यांनी कुसुमाग्रजांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘बळ’ ही कविता नाट्याच्या रुपात सादर केली. शिक्षिका मयुरी जेजुरीकर यांनी ‘अहि नकुल’ ही कविता अभिनयातून सादर केली.

श्रीराम घडे यांनी ग्रामीण ढंगात सादर केलेल्या कवितेला रसिकांचा प्रतिसाद मिळाला. जयवंत पवार यांच्या ‘बायकोचा रुसवा’ या कवितेने रसिक प्रेक्षकांना पोट धरून हसवले. मीरा कोन्नुर यांनी दिवाकरांची ‘कोकिलाबाई गोडबोले’ ही नाट्यछटा सादर केली. अविनाश शिंदे यांनी ‘आई’ ही नाट्यछटा उत्कृष्ट रीतीने सादर केली. माधुरी कुलकर्णी आणि विजय कुलकर्णी यांनी ‘ध्यास’, ‘आता काढा उतरा मांडव’ आणि ‘एक प्रश्नोत्तर’ या तीन कविता एकत्रित गुंफून रसिक श्रोत्यांना मंगेश पाडगावकर, ग.दि. माडगुळकर आणि कुसुमाग्रज या तीन कवींच्या कवितांचा आनंद दिला. सोडूनी गोकुळास ही गवळण सायली रौंधळ आणि मुक्ता भावसार यांनी नृत्याच्या रुपात सादर केली.

विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनातील प्रसंगावर बेतलेल्या या नृत्याने रसिकांची वाहवा मिळवली. चैतन्य जोशी यांनी विनायक दामोदर सावरकर यांची ‘अनादि मी अनंत मी’ कविता अभिनित केली. कौस्तुभ ओक यांनी मराठी भाषेची थोरवी गाणारी स्वरचित कविता सादर केली. ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

डॉ. परांजपे यांनी प्रास्ताविक केले. सायली रौंधळ आणि चैतन्य जोशी यांनी अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन केले. डॉ. विनया केसकर यांनी आभार मानले.

कलापिनीच्या अवकाश या समीप रंगमंचावर सदर झालेल्या कार्यक्रमाला मुले, युवक कलाकार आणि ज्येष्ठ कलाकार मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. प्रेक्षकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला ही मराठी प्रेमींसाठी आनंदाची बाब आहे.

प्रतिक मेहता, सायली रौंधळ चैतन्य जोशी, डॉ. विनया केसकर, रश्मी पांढरे, राखी भालेराव, मीनल साळुंखे यांनी संयोजन केले

Pimpri News : महापालिकेतर्फे वसंतदादा पाटील यांना अभिवादन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.