Pune: आखाड जोरात ! रविवारी पुणेकरांनी फस्त केले 800 टन चिकन आणि 4 टन मासळी

Pune: On Sunday, Pune residents eat 800 tonnes of chicken and 4 tonnes of fish रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.

एमपीसी न्यूज- आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी पुणेकरांनी तब्बल 800 टन चिकन, चार टन मासळी आणि अंदाजे दीड ते दोन हजार बोकड फस्त केले. यंदा लॉकडाऊन असल्यामुळे आवक जरी कमी असली तरी पुणेकरांचा उत्साह मात्र नेहमीप्रमाणेच होता. त्यामुळे अनेक चिकन-मटनच्या दुकानांसमोर पहाटेपासूनच रांगा लागल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी दिसत होते.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु, यामध्ये एक दिवसाची शिथिलता देण्यात आली होती.

त्यानुसार रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे शहरातील अनेक छोट्या-मोठ्या चिकन, मटण आणि मासळी विक्रेत्यांच्या दुकानासमोर गर्दी होती.

आखाडानंतर श्रावण, त्यानंतर गणेशोत्सव असल्याने या काळात अनेकजण मांसाहार करत नाहीत. त्यामुळे आखाड महिन्याच्या शेवटच्या दिवशी अथवा काही दिवस आधीपासून मांसाहार केला जातो.

त्यामुळेच रविवारी चिकन-मटण आणि मासळीला दुप्पट मागणी होती. यावर्षी पनवेल, रायगड या ठिकाणीही लॉकडाऊन असल्यामुळे अपेक्षित मासळी पुण्यात येऊ शकली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.