Pune : पिंपरी चिंचवड शहरात राहणारे मध्य प्रदेशातील दीड हजार मजूर श्रमिक रेल्वेने रवाना

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात कामानिमित्त राहणारे आणि मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असलेले 1 हजार 455 नागरिक आज, गुरुवारी (दि. 14) त्यांच्या  मूळ गावी  श्रमिक रेल्वेने रवाना झाले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष काळजी घेत या कामगारांना गावी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पिंपरी चिंचवड शहराची देशभरात औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. त्यामुळे नोकरी, रोजगाराच्या शोधात दररोज शेकडो नागरिक देशाच्या विविध भागातून शहरात दाखल होतात. मिळेल ती नोकरी, काम करून आपला उदरनिर्वाह करतात. कुटुंबापासून दूर राहून काम करताना काही दिवसाच्या अंतराने गावी चक्कर मारून परत कामधंदा करणारी मंडळी लॉकडाऊनमुळे शहरात अडकली आहे.

त्यात भरीस भर म्हणजे लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद झाले. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल सुरू झाले. उधारीचं जगणं आणखीनच महाग झालं. शहरवस्तीत काम बंद झालं तर खर्चही बंद होतो, असं नाही. खर्च सुरूच राहतो. घरभाडे, रेशन, वैद्यकीय आणि अन्य अनेक आवश्यक गोष्टी पैशांशिवाय मिळत नाहीत. त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या विविध भागातून आलेल्या अनेकांचे हाल सुरू झाले.

पिंपरी चिंचवड शहर परिसरात राहणाऱ्या अनेक परराज्यातील नागरिकांनी प्रशासनाकडे गावी जाण्यासाठी नोंदणी केली होती. मध्य प्रदेश राज्यातील सुमारे दीड हजार नागरिकांची नोंद झाली होती. त्यामुळे या सर्व नागरिकांना विशेष रेल्वेने जाण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून व्यवस्था केली.

पुणे (महाराष्ट्र) ते रेवा (मध्य प्रदेश) या स्थानकांदरम्यान ही रेल्वे धावणार आहे. यामध्ये वाकड परिसरातील 1 हजार 99, देहूरोड परिसरातील 330 आणि पुणे ग्रामीण परिसरातील 26 नागरिकांचा समावेश आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजता ही रेल्वे पुणे स्थानकावरून निघाली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी उत्तराखंड येथे जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना देखील त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मदत केली आहे. वाकड, हिंजवडी पोलिसांनी शेकडो परप्रांतीय नागरिकांना एसटी बसमधून त्यांच्या मूळ गावी पाठवून दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.