Pune : परकीय चलनाची तस्करी केल्याप्रकरणी एकास अटक; 38 लाखांचे परकीय चलन जप्त

सीमा शुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज – परकीय चलनाची तस्करी करणाऱ्या एकास सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून काल (दि. 23) सायंकाळी अटक केली त्याच्याकडून सुमारे 38 लाख 41 हजार रुपयाचे परकीय चलन जप्त केले आहे.

विशाल विठ्ठल गायकवाड (वय 22, रा. खानापूर,जि. सांगली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

  • याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ निरीक्षक अमजद शेख यांनी सांगितले कि, विशाल गायकवाड हा सुमारे 38 लाख 41 हजार रुपयाचे परकीय चलन घेऊन तो परदेशी निघाला होता. यावेळी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून काल (दि. 23) सायंकाळी अटक केली.

त्याच्याकडे कुवेत, बहरीन, दुबई, ओमान आदी देशातील चलन होते. तो पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून एअर इंडियाच्या विमानाने काल (दि. 23) सायंकाळी जात होता. यावेळी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे सुमारे 38 लाख 41 हजार रुपयाचे परकीय चलन सापडले.

  • याप्रकरणी त्याला अटक केली असून आज सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सुमारे चौदा (14) दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून अंजली देसाई यांनी काम पहिले.

तसेच ही कारवाई सीमा शुल्क विभागाचे (पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ) उपायुक्त भरत नवले यांच्या मागर्दर्शनाखाली अधीक्षक सुधा अय्यर, अधीक्षक विनिता पुसदेकर, अधीक्षक माधव पळणीटकर,वरिष्ठ निरीक्षक अमजद शेख, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील निरीक्षक देशराज मीना यासह सीमा शुल्क विभागाचे अधिकारी यांनी केली. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक अमजद शेख हे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.