Pune : एका झुरळामुळे विमान कंपनीला बसला 50 हजारांचा फटका

एमपीसी न्यूज- विमान प्रवासात आसनाखाली झुरळ निघाले म्हणून दोन प्रवाशांनी इंडिगो विमान कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. ग्राहक तक्रार निवारण मंचाने प्रवाशांना 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला तसेच संबंधित विमान प्रवाशांना तिकिटाची रक्कम नऊ टक्के व्याजदराने परत करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी स्कंद असीम बाजपेयी (रा. कल्पिका अपार्टमेंट, शीला विहार कॉलनी, कोथरूड) आणि सुरभी राजीव भारद्वाज (रा. वनराई हाइटस्, एमआयटी कॉलेज रस्ता, कोथरूड) यांनी इंडिगो आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याविरुद्ध ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती.

याबाबतची माहिती अशी की, बाजपेयी आणि भारद्वाज हे दोघे 31 डिसेंबर 2018 रोजी इंडिगो विमान कंपनीच्या विमानातून पुणे ते दिल्ली प्रवासाला निघाले होते. विमान प्रवासात त्यांच्या आसनाखाली झुरळ निघाल्याने त्यांनी त्वरित तो भाग निर्जंतुक करण्याची विनंती विमानातील कर्मचाऱ्यांकडे केली. मात्र निर्जंतुकीकरण करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार मोबाइल मेसेज आणि ई-मेलद्वारे नोंदविण्यास सांगितले.

दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर बाजपेयी आणि भारद्वाज या दोघांनी विमान कंपनीकडे तक्रार नोंदवली. मात्र तक्रारदाराने केलेली तक्रार गंभीर नसल्याचे कंपनीकडून कळविण्यात आले. त्यानंतर त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली.

बाजपेयी यांनी तक्रारीत नमूद केले होते की, ‘माझ्या हाताला जखम झाली होती. झुरळापासून बचाव करताना मला वेदना झाल्या. मला संसर्गजन्य आजार असल्याने मला झुरळाचा त्रास झाला.’ याबाबत तक्रार करूनही योग्य दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नुकसानभरपाई आणि तक्रार खर्चाची रक्कम देण्याची मागणी बाजपेयी आणि भारद्वाज यांनी केली होती. ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्या क्षितीजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी तक्रारदाराला 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई आणि नऊ टक्के व्याजदराने तिकीटाची रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.