Pune : धायरी येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

पीडित मुलीच्या मावशीच्या पतीनेच केले घृणास्पद कृत्य

एमपीसी न्यूज- धायरी येथे अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणी एका आरोपीला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या मावशीच्या पतीनेच हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे.

नितीन दामोदर (रा. नऱ्हे ) असे अटक करण्यात आलेल्या काकाचे नाव आहे .

सिंहगड रस्त्यावर धायरीतील गारमाळ परिसरात गुरुवारी अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. राहत्या घरीच तिची हत्या करण्यात आली होती.

पीडित मुलीचे आईवडील मजुरी करतात. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले असताना मुलगी घरात एकटीच होती. संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर पीडित मुलगी घरात बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ससून रुग्णालयात शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आले असता तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले. सिंहगड रोड पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. तपासात पीडित मुलीच्या मावशीच्या पतीनेच हा घृणास्पद प्रकार केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी नितीन दामोदर यास अटक केली. सिहंगड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.