Pune: पंतप्रधानाच्या स्वागतासाठी विमानतळावर केवळ भाजप नेत्यांना प्रवेश; राष्ट्रवादीचे आमदार नाराज

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यात लोहगाव विमानतळावर स्वागत करण्यासाठी केवळ भाजप नेत्यांनी निमंत्रित करण्यात आल्याने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पंतप्रधानांच्या आगमनाच्या वेळी त्यांचे स्वागत करताना राजशिष्टाचारानुसार ठराविक अधिकारी व पदाधिकारी यांनाच निमंत्रित केले जाते. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शहरातील भाजपचे आमदार व महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी यांना आमंत्रण देण्यात आला. या राजशिष्टाचार समितीत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही आमदारांची नावे नसल्याने त्यांनी आक्षेप घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व हडपसरचे आमदार चेतन तुपे तसेच विमानतळ असलेल्या वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांना पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बोलावण्यात आले नव्हते. पंतप्रधान हे कोणत्याही पक्षाचे नसतात तर संपूर्ण देशाचे असतात, त्यामुळे पंतप्रधानांच्या स्वागताला सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना बोलावणे आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना डावलणे निषेधार्ह आहे, असे आमदार तुपे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.