Pune: …तेव्हाच कोरोनाचा अंत होईल, पोलीस आयुक्तांचे टि्वट

Pune: Only then will the corona end, tweeted the Commissioner of Police dr k venkatesham पोलिसांच्या 100 नंबरवर सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे 'कोरोना कधी संपणार ?'.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांपासून देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांबरोबरच उद्योजक, व्यापारीवर्ग, नोकदारांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे साहजिकच सर्वांना आता हा कोरोना कधी संपणार? असा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिक हा प्रश्न आता पोलिसांना विचारत आहेत. पोलिसांच्या 100 नंबरवर सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘कोरोना कधी संपणार ?’. खुद्द पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. जेव्हा आपण सर्व नियमांचं पालन करायला सुरुवात करु, तेव्हाच कोरोनाचा अंत होईल, असे उत्तरही त्यांनी दिले आहे.

सीपी पुणे सिटी या पोलीस आयुक्तांच्या अधिकृत टि्वटर हँडलवर डॉ. वेंकटेशम यांनी ही माहिती दिली. ‘कोरोना कधी संपणार?’ हा प्रश्न #Dial100 वर आम्हाला सतत विचारला जातो.


या प्रश्नाचं अचूक उत्तर देणे कठीण आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. पण आम्ही एक गोष्ट सुचवू शकतो- जेव्हा आपण सर्व नियमांचं पालन करायला सुरुवात करू, तेव्हाच कोरोनाचा अंत होईल, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

आयुक्त वेंकटेशम यांच्या उत्तराला बहुतांश नेटिझन्सनी दुजोरा दिला आहे. नागरिकांनी स्वतः नियमांचे पालन केल्यास आपण कोरोनाला पराभूत करु शकतो, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, पुणे शहरात रविवारी (दि.22) दिवसभरात तब्बल 620 रुग्ण नव्याने आढळले. ही आजपर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. पुणे शहरात आतापर्यंत 12 हजार 474 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4 हजार 529 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील 290 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक असून 60 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.