Pune: पुणे मनपाची आपत्कालीन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली, विरोधी पक्षांचा आरोप

Pune: Opposition alleges that the administration is not serious about to the Corona action plan कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची जबाबदारी ही प्रशासनावर आणि सत्ताधारी यांच्यावर राहिल, असा इशारा या विरोधी पक्षांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका प्रशासनाने कोरोना संदर्भात पुढील 3 महिन्यांचा आराखडा तयार करण्याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. यासंदर्भात बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र, प्रशासन उदासीन असल्याचा आरोप राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसेतर्फे मंगळवारी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. पुणे मनपाची आपत्कालीन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असा आरोपही विरोधी पक्षांनी केली आहे.

प्रशासनाला कोरोना पुणे शहरातून हद्दपार करण्यासाठी आवश्यक सुविधा मुख्य सभेच्या माध्यमातून निधी देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली होती. यावेळी पुढील 3 महिन्यांत प्रशासनाला आवश्यक ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरवर, भरती प्रक्रिया, कोविड सेंटर, क्वारंटाइन कक्ष, रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे, कोरोना विषयक येणारा खर्च किती असणार, अशा सर्व मुद्यांबाबत चर्चा करून आराखडा करण्याचे ठरले होते.

त्यानुसार आराखडा तयार करून पुणे महापालिकेचे पदाधिकारी आणि सर्व पक्षाचे गटनेते यांच्या सोबत आढावा बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र, ही बैठक काही झाली नाही.

त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे विचारणा केली असता, महापौर यांची आढावा बैठकीसाठी वेळ उपलब्ध झालेली नाही, असे सांगण्यात आले. पुणे मनपाची आपत्कालीन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

रुग्णांना बेड मिळत नसल्याने आणि वेळेवर उपचार होत नसल्याने मृत्यू होत आहेत, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केला आहे.

डॅशबोर्डवर बेडची माहिती चुकीची व अपुरी दिली जात आहे. दैनंदिन रुग्णांची संख्या जाहीर केली जात असून, ती चुकीची आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनीही आक्षेप घेतलेला आहे. याचाही खुलासा होणे आवश्यक आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची जबाबदारी ही प्रशासनावर आणि सत्ताधारी यांच्यावर राहिल, असा इशारा या विरोधी पक्षांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.