Pune : आगामी महापालिका निवडणुकीसाठी विरोधी पक्षांना चांगली संधी; पुणेकरांनी भाजपला आणले जमिनीवर

एमपीसी न्यूज – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत पराभव करण्यात आला. तर, खडकवासला, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांत विजय मिळविता भाजप उमेदवारांच्या तोंडाला फेस आला. उर्वरित कसबा, पर्वती आणि कोथरूड मतदारसंघांतही भाजपच्या मतांमध्ये कमालीची घट झाली आहे.

या निवडणुकीने भाजपला जमिनीवर आणले. त्यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँगेस, शिवसेना, मनसे, वंचित, एमआयएम, आरपीआय (आठवले गट) आशा सर्वच विरोधी पक्षांना चांगली संधी आहे.

हडपसर आणि वडगावशेरी हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीने भाजपच्या तावडीतून हिसकावून घेतले. शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांत भाजप उमेदवारांचा केवळ 5 – 5 हजार मतांनी विजय झाला. तर, खडकवासला मतदारसंघात भिमराव तापकीर केवळ 2500 मतांनी विजयी झाले. कोथरूड मतदारसंघात खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उभे होते. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

लोकसभेला गिरीश बापट यांना एक लाख मतांचे लीड होते. त्यापेक्षाही पाटील यांना 1 लाख 60 हजार मतांनी विजयी करणार असल्याचा निर्धार भाजप व्यक्त करीत होते. पण, कोथरूडकरांना ते फारसे पटले नाही. या मतदारसंघात मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना काँगेस – राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. केवळ 25 हजार मतांनी पाटील यांचा विजय झाला. एकट्या कसबा विधानसभा मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक यांनी 28 हजार मतांनी विजय मिळविला. पर्वती मतदारसंघात आमदार माधुरी मिसाळ यांच्या मताधिक्यात 30 हजारांची घट झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.