Pune: विरोधकांनी राज्य शासनाकडूनही निधी आणावा : महापौर

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या आपत्ती काळात विशेष अधिकार महापालिका  प्रशासनाला दिले आहेत. प्रत्येक रुपयाचा हिशेब त्यांच्याकडून घेऊ. याचा सविस्तर अहवाल नगरसेवकांना देण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. विरोधक ज्याप्रमाणे पैशाचा हिशेब मागत आहे. त्याच प्रकारे पुढाकार घेऊन राज्य शासनाकडूनही निधी मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही महापौरांनी व्यक्त केली.

यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते.

सध्या सर्वजण कोरोना आपत्तीत अहोरात्र काम करीत आहेत. या काळात मुख्य सभा घेण्याची विरोधी पक्षाची मागणी योग्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून  महापालिकेला सर्वसाधारण सभा घेण्याची परवानगी मागितली आहे. पण, शासनाकडून काहीही उत्तर आले नाही.

राज्य शासनाचे आदेश  केवळ पुण्यासाठीच नव्हे तर  राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू आहेत. विरोधी पक्षांना जर सभा हवी असेल तर त्यांनीही  राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.

येत्या काही दिवसांत कोरोनाबधित रुग्णांची संख्या वाढणार असल्याने जम्बो हॉस्पिटलची गरज आहे. तर, पुणे शहरात निर्माण झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी विरोधी पक्षाला विश्वासात घ्यावे. महापालिकेला निधी मिळण्यासाठी आम्हीही पाठपुरावा करू, असे प्रतिउत्तर विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.