Pune : डेक्कन कॉलेजमध्ये शनिवारी मेहेरबाबा जीवन परिचय सत्राचे आयोजन

एमपीसी न्यूज : अवतार मेहेरबाबा यांच्या जीवनाचा, त्यांच्या जीवनकार्याचा आणि शिकवणीचा परिचय (Pune) अधिकाधिक लोकांना व्हावा आणि डेक्कन कॉलेजच्या गौरवशाली परंपरेचे देखील लोकांना ज्ञान व्हावे, या दुहेरी हेतूने मेहेरबाबा प्रेमी आणि कॉलेज यांनी एकत्र येऊन एकदिवसीय परिचयसत्राचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (दि. 11) पुण्यातील डेक्कन संस्थेच्या पुरातत्त्व विभागानजीक असलेल्या दीक्षांत सभागृहामध्ये हा मेळावा सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत आयोजित केला आहे.

पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधनासाठी डेक्कन कॉलेज ही पुण्यातील एक प्रथितयश संस्था आहे. या संस्थेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी राजकारण, समाजकारण, साहित्य, वैद्यकशास्त्र आदी अनेक क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व यश संपादन केले आहे. ऑक्टोबर 1821 मध्ये हिंदु कॉलेज या नावाने प्रारंभ झालेल्या या संस्थेने दोन वर्षांपूर्वी त्यांचे द्विशताब्दी वर्ष साजरे केले आणि विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड योगदान दिलेल्या आपल्या अनेक ख्यातनाम माजी विद्यार्थ्यांचे स्मरण केले.

स्वतःला सद्य युगाचे ईश्वरावतार घोषित केलेल्या मेहेरबाबांनी देखील 1912 व 1913 या दोन वर्षांमध्ये येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले होते. त्या काळात ते मेहेरवान शेरीयार इराणी या त्यांच्या मूळ नावाने ओळखले जात असत. जानेवारी 1914 मध्ये पुण्यातीलच वयाची शंभरी गाठलेल्या स्त्री सदगुरु हजरत बाबाजान यांनी मेहेरवानच्या कपाळाचे अवघ्राण केले आणि त्याचे दिव्यत्व अनावृत्त केले. या घटनेने केवळ मेहेरवानचा जीवनक्रम बदलला नाही तर समस्त सृष्टीच्या नवीन वाटचालीचे आणि आध्यात्मिक परिवर्तनाचे सूतोवाच केले गेले.

 

या परिचय सत्रात मेहेर बाबांच्या जीवनाशी व कार्याशी संबंधित छोट्या दृश्यफितींसोबत बाबांचे कार्य आणि संदेश (Pune) याची प्रारंभिक माहिती या परिचयासत्रातील भाषणांद्वारे लोकांना करून देण्यात येईल. मेहेरबाबांची आध्यात्मिक अधिकार, त्यांच्याशी संबंधित पुण्यातील स्थळांची माहिती, बाबांचे महा कौन, दैवी योजना स्पष्ट करणारी त्यांची मानचित्रे, संस्कारांवर विजय प्राप्त करण्यास उपयुक्त अशी त्यांची आध्यात्मिक शिकवण अशा बौद्धिक खाद्य पुरवण्याऱ्या अनेक विषयांसोबतच बाबांच्या महत्त्वाच्या संदेशांचे वाचन आणि भावनिक साद घालणारी भक्तिगीते यांचाही समतोल साधणारा समावेश या कार्यक्रमामध्ये असणार आहे.

Maharashtra Budget 2023 : नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि अश्विनी जगताप यांनी घेतली शपथ

हा कार्यक्रम सर्व ईश्वरप्रेमींसाठी व आध्यात्मिक संशोधकांसाठी खुला असणार आहे. फेब्रुवारी महिन्यात मेहेरबाबांवरील जवळजवळ 90 पुस्तकांची, ज्यात बाबांचे डिस्कोर्सेस आणि गॉड स्पीक्स सारखे अतुलनीय ग्रंथ सम्मिलीत आहेत, देणगी देऊन जगभरच्या मेहेरबाबा प्रेमी प्रकाशकांनी डेक्कन कॉलेजच्या ग्रंथसंपदेत मोलाची भर टाकली आहे. अभ्यासकांना त्याचाही लाभ या कार्यक्रमात घेता येणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – प्रशांत अहिर – 9975619116

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.