Pune Oxygen Audit : जिल्ह्यात ऑक्सिजन दुर्घटना टाळण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – सध्या महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी ऑक्सिजन गळती दुर्घटना आणि ऑक्सिजनचा तुटवडा या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्या परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या दुर्घटना होऊ नये आणि ऑक्सिजनचा अपव्यय टाळण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्यासाठी जिल्ह्यात 111 पथके नेमण्यात आली आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील एकूण 639 रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्यात येणार आहे. या कामगिरीसाठी नेमलेल्या पथकांमध्ये अभियांत्रिकी कॉलेजमधील प्राध्यापकांचा समावेश आहे.

ऑडिट कसे करायचे याचे ऑनलाइन प्रशिक्षण संबंधित प्राध्यापकांना देण्यात आले आहे. त्यामध्ये ऑक्सिजनचा वापर कसा करावा, आयसीयूमधील ऑक्सिजन बचत कशी करावी, ऑक्सिजन टँकपासून प्रत्येक वॉर्डमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या उपकरणांमधील गळती होत असल्यास ती दुरुस्त कशी करून घ्यायची, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ही पथके तपासणीसाठी आल्यानंतर संबंधित रुग्णालयांनी पथकांना पीपीई कीट उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.