Pune : पंडित आनंद भाटे यांचा साई पुरस्काराने गौरव

पंडित आनंद भाटे यांचे सादरीकरण म्हणजे परिपूर्ण कलेचा आविष्कार : प्रा. मिलिंद जोशी

एमपीसी न्यूज  : वेगवेगळ्या कलांच्या कड्या एकमेकात गुंफलेल्या असतात. कलांमधील आंतरसंवाद महत्त्वाचा असतो. कलाकाराला प्रतिभेसह साधनेची जोड असणे आवश्यक असते. (Pune)ही साधना आनंदगंधर्व पंडित आनंद भाटे यांनी केली असल्यामुळे त्यांची कला ही परिपूर्ण कलेचा आविष्कार आहेअसे गौरवोद्गार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी काढले.

साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे श्री रामनवमीनिमित्त साई पुरस्कार वितरण सोहळ्याचे आज बुधवार पेठेतील साईनाथ मंदिर आवारात आयोजन करण्यात आले होते. पंडित आनंद भाटे यांचा गौरव प्रा. जोशी व ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते झाला. त्या वेळी प्रा. जोशी बोलत होते. साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा व्यासपीठावर होते. पुणेरी पगडी, शाल, गौरवपत्र, फळपरडी आणि साईबाबा यांची मूर्ती असलेले गौरवचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

ट्रस्टचे विश्वस्त प्रवीण वळवडेकर, अमर राव, अमित दासानी, शंकर निंबाळकर, नरेंद्र व्यास, संगीत निंबाळकर,  सुभाष पुजारी, नंदकुमार ओव्हाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. जोशी म्हणाले, थोडक्या वेळात सादरीकरण करणे हे आजच्या काळात कलाकारांसमोरील मोठे आव्हान आहे. या वेळी कलकाराने आपली कला उत्कटतेने सादर करणे आवश्यक असते. ही कला भाटे यांना अवगत आहे. गंधर्व गायकीची परंपरा भाटे यांनी समर्थपणे पुढे नेली आहे आणि त्यात भरही घातली आहे.(Pune) नाट्यगीतांना त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. कलाकाराच्या जीवनातून कला वजा केल्यानंतर जे उरते ते त्या कलाकाराचे खरे संचित असते.

Bhosari : वडमुखवाडी येथील श्री साईबाबा मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

पंडित उपाध्ये म्हणाले, संगीत आत्मसात करून घेण्यासाठी उत्तम बुद्धिमत्ता लागते कारण संगीतामध्ये शंभर टक्के अचूकता असणे आवश्यक असते. बालगंधर्व यांची गायकी गळ्यावर चढल्यानंतर पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून किरणा घराण्याची तालिम घेतल्यामुळे किराणा घराण्याची परंपरा आनंद भाटे यशस्वीपणे पुढे नेत आहेत. पूर्वीप्रमाणे दीर्घकालीन संगीताच्या मैफलींचे आयोजन केल्यास अशा बैठकीमध्ये गायन सादर करण्याची ताकद पंडित आनंद भाटे यांच्याकडे आहे.

सत्काराला उत्तर देताना पंडित आनंद भाटे म्हणाले, साईबाबांच्या नावे रामनवमीच्या दिवशी मिळणारा पुरस्कार ही भाग्याची गोष्ट आहे. अनेक गणेश मंडळे विविध क्षेत्रात उत्तम प्रकारे कार्यरत आहे हे एक समाजप्रबोधनच आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात महान कार्य करणाऱ्या पंडित अतुलकुमार उपाध्ये (Pune) आणि प्रा. जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना मला विशेष आनंद होत आहे. पुरस्कार हा कलाकाराला मिळतो परंतु त्यामागे गुरू, पालक, कुटुंबिय यांचे मार्गदर्शन आणि योगदान मोलाचे असते त्यामुळे हा पुरस्कार या सर्वांच्या वतीने स्वीकारत आहे. रसिकांच्या आग्रहाखातर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले ‘मन हो राम रंगी रंगले’ ही भक्तीरचना आनंद भाटे यांनी सादर केली. सादरीकरणास रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

पियुष शहा यांनी प्रास्ताविकात साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वाटचालीचा गौरवशाली आढावा सादर केला. सामाजिक कार्यात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत प्रविण वळवडेकर, नरेंद्र व्यास, बाबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन आणि गौरवपत्राचे वाचन जतीन पांडे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.