Pune : हडपसरमधून जास्त लीड द्यायचाय !- पंकजा मुंडे

एमपीसी न्यूज – खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तीन टर्म तुमची सेवा केली. आता योगेश टिळेकरही बरोबर आहेत. योगेश यांनी आधी नगरसेवक म्हणून आणि आता आमदार म्हणून चांगली सेवा केली आहे. त्यामुळे हडपसरमधून मागच्यापेक्षा जास्त लीड तुम्ही मला द्यायचा आहे, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला आवाहन केले.

शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय-शिवसंग्राम-रयतक्रांती महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी कात्रज येथे जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या सभेला आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार महादेव बाबर, विकास रासकर, नगरसेवक वीरसेन जगताप, प्रमोदनाना भानगिरे, मारुतीआबा तुपे, नगरसेविका राणी भोसले, संगीता ठोसर, रंजना टिळेकर, प्राची आल्हाट, वृषाली कामठे, मनीषा कदम, कल्पना थोरवे, भाजप ओबीसी सेलचे राजू केकाण, सुभाष जंगले, अभिमन्यू भानगिरे, समीर तुपे, अमोल हरपळे आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या, “लोकांनीच मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं ठरवलंय. त्यांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यासाठी तुम्हाला शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव यांनाच निवडून द्यायचं आहे. पोराच्या-मुलीच्या प्रचारात पवारांचे कुटुंब अडकले आहे. त्यांना सभा घेणे नाकीनऊ झाले आहे. कधी तरी बारामती आणि मावळला जाता-येता मध्येच एखादी सभा शिरूरमध्ये घेऊन म्हणायचे खासदार निष्क्रीय आहेत. मग 40 वर्षे राज्यात तुमची सत्ता होती. तुम्ही स्वत: केंद्रात मंत्री होता, मग त्यावेळी तुम्हाला या भागाचे प्रश्‍न का दिसले नाहीत?” असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला.

प्रत्येक शेतकऱ्याला 6 हजार रुपये अनुदान जाहीर केलं. त्यानुसार पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमाही झाला. शेतमालाला हमी भाव दिला, कर्जमाफी योजना राबवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. आयुष्मान भारतसारखी विमा योजना आणली. उज्वला योजनेतून महिलांच्या डोळ्यातून येणारे धुराचे अश्रू थांबवले. लाभार्थीच्या खात्यात थेट अनुदान जमा करुन भ्रष्टाचार थांबविला. अजून बरचं काही करायचं आहे” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.