सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pune : भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये चार लहान मुलांचा समावेश (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- कोंढव्यामधील सोमजी पेट्रोल पंपाजवळ इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. मृतांमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा 18  पर्यंत जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. बांधकाम मजुरांसाठी तात्युरत्या स्वरूपात बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर ही भिंत कोसळली. अजूनही काही लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून घटनास्थळी एनडीआरएफचे पथक, पुणे अग्निशमन दलाचे जवान आहेत. मदतकार्य अजूनही सुरू आहे.

कोंढव्यामध्ये सोमजी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या आल्कन स्टायलस या सोसायटीच्या कंपाउंडची भिंत शेजारी बांधकाम मजुरांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर कोसळली. आल्कन स्टायलस सोसायटीच्या शेजारी इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या झोपड्या या सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून बांधण्यात आल्या होत्या.

या इमारतीचा पाया बांधण्यासाठी 40 ते 50 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. पावसामुळे सोसायटीची पार्किंगची संरक्षक भिंत खचून ही दुर्घटना घडली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत मृत झालेले सर्व मजूर पश्चिम बंगाल आणि बिहार येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

“पोलीस या घटनेचा तपास करीत असून दोषी व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच सादर बांधकामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का तसेच सुरक्षा उपायांचा अवलंब करण्यात आला आहे का हे तपासण्यात येईल” अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी दिली.

दुर्घटनेची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना शासनाकडून नियमानुसार भरपाई दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.

मृतांची नावे

अलोक शर्मा (वय 28), मोहन शर्मा (वय 24), अमन शर्मा (वय 19 ), रवी शर्मा (वय 19), लक्ष्मीकांत शनी (वय 33), सुनील सिंग (वय 35), भीमा दास (वय 38), संगीता देवी (वय 26), निवा देवी (वय 30), दीप रंजन शर्मा व अवदेश सिंग (वय समजू शकले नाही ) ओवी दास (वय 2), सोनाली दास (वय 6), अजितकुमार शर्मा (वय 7), रेखालकुमार शर्मा (वय 5), (सर्वजण रा. जि . कटिहार, बिहार ) अशी मृतांची नावे आहेत.

https://www.youtube.com/watch?v=YHdlkEc9RA4&feature=youtu.be

 

spot_img
Latest news
Related news