Pune: सौदी अरेबियात अडकलेल्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग मोकळा; खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश

Pave way for those stranded in Saudi Arabia to return to Maharashtra; Success in the pursuit of MP Amol Kolhe

एमपीसी न्यूज – सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी चार्टर्ड विमानाला मुंबईत उतरण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली असून या नागरिकांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्र मंडळ, सौदी अरेबियाचे अध्यक्ष मधुकर हडकर यांनी डॉ. कोल्हे यांना निवेदने पाठवून मदतीची विनंती केली होती.

त्यामुळे डॉ. कोल्हे यांनी सातत्याने केंद्र व राज्य सरकारने सौदी अरेबियातून महाराष्ट्रातील नागरिकांना घेऊन येणाऱ्या चार्टर्ड विमानाला मुंबई व पुणे येथे उतरण्याची परवानगी द्यावी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेरीस खा. डॉ. कोल्हे व खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारने परवानगी दिली.

परंतु, राज्य सरकारने परवानगी देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी करण्यास विलंब होत होता. या संदर्भात डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार व संपर्क साधला होता.

त्यांच्या चिकाटीने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने अखेरीस आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सौदी अरेबियात अडकलेलया महाराष्ट्रातील नागरिकांचा परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हजारो भारतीय नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेले होते. मात्र, कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर या नागरिकांच्या नोकऱ्या संपुष्टात आल्या.

त्यामुळे त्यांना भारतात परतणे आवश्यक झाले होते. परंतु लॉकडाऊनमुळे विमानसेवा बंद असल्याने त्यांना भारतात परत येण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत होते.

दरम्यान, केंद्र सरकारने ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत विमानसेवा सुरू केल्यानंतर सौदी अरेबियातील अनेक भारतीय नागरिक भारतात परतत होते.

मात्र, महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबई, नागपूर अथवा पुणे येथे येणारी फ्लाईट्स उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र मंडळ, सौदी अरेबिया या संघटनेचे अध्यक्ष मधुकर हडकर यांनी सर्व महाराष्ट्रीयन नागरिकांची एकजूट उभारून चार्टर्ड विमानाने येण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले.

त्यांच्या प्रयत्नांना डॉ. कोल्हे यांनी आवर्जून प्रतिसाद दिला आणि आपल्या बांधवांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

 

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, सौदी अरेबियात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परतण्यासाठी सातत्याने ई-मेल, फोन येत होते. सौदी अरेबियातील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मधुकर हडकरही सतत संपर्कात होते. तेथील महाराष्ट्रीयन बांधवांची मनोवस्था व अडचणी मी समजू शकत होतो. म्हणूनच मी त्यांच्यासाठी झटून एका मिशनप्रमाणे प्रयत्न करीत होतो. या प्रयत्नांना यश आले याचा आणि आता आपले बांधव घरी परत येतील, याचा मला अतिशय आनंद झाला आहे, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.