Pune: वीजबिल चेक ऐवजी ऑनलाईन भरा; महावितरणचे ग्राहकांना आवाहन

Pune: Pay electricity bill online instead of cheque; MSEDCL appeals to customers वीजबिलांच्या देय मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचे बिल थकबाकीसह येण्याची शक्यता आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम झालेला असून वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत असल्याने वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर महावितरणने वीजमिटरचे रीडिंग व वीजबिलांचे वाटप तसेच वीजबिल भरणा केंद्र सुरू केले आहे. जूनमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांच्या वीजवापराचे मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यात आले आहे.

ग्राहकांनी धनादेशाद्वारे वीजबिलांचा भरणा केला असेल तर नियमानुसार ज्यादिवशी धनादेश वटविला जाईल, त्याच दिनांकाला सदर रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केली जाते.

मात्र, लॉकडाऊनमुळे अनेक बँकांमध्ये मनुष्यबळांची संख्या मर्यादित असून प्रतिबंध क्षेत्रातील बँक बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाने वीजबिलाकरिता धनादेश दिला असेल तर बँकांकडून धनादेश वटविण्यास उशीर होत आहे.

वीजबिलांच्या देय मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचे बिल थकबाकीसह येण्याची शक्यता आहे. तसेच काही कारणास्तव धनादेश बाऊन्स झाल्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यासाठी 750 रुपये दंड देखील पुढील वीजबिलात लागू शकतो. यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो.

तसेच कोविड-19 च्या प्रादुर्भावामध्ये धनादेश जमा करण्यासाठी बँका किंवा महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात जाण्याचा धोका पत्करण्याऐवजी ऑनलाईन वीज भरणा करावा.

ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी महावितरण मोबाईल अ‍ॅप तसेच www.mahadiscom.in या वेब साईटचा वापर करावा. याशिवाय वीजबिलांवर महावितरणच्या बँकेचे छापील तपशील असणाऱ्या ग्राहकांनी आरटीजीएस व एनईएफटीचा वापर करावा असेही आवाहन महावितरणने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.