Pune : विजबिलांचा भरणा ऑनलाइन करा; ‘महावितरण’चे ग्राहकांना आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल एप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यायाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. मात्र, विजबिल भरण्यासाठी ग्राहकांची गैरसोय होणार नाही यासाठी घरबसल्या ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. विजग्राहकांसाठी महावितरण मोबाईल एपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना त्यांचा स्वतःच्या अनेक वीजबिलांचा भरणा करण्याची सोय आहे.

यासोबतच महावितरणने लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल ऍपची सेवा उपलब्ध आहे. चालू व मागील विजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे.

विजबिल भरण्यासाठी महावितरणच्या ‘ऑनलाईन’ सेवेला पुणे परिमंडलांतील सुमारे 54 टक्के वीजग्राहकांचा दरमहा प्रतिसाद मिळत आहे. मात्र सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वीजग्राहकांनी घरबसल्याच ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणकडून 23 मार्चपासून छपाई केलेल्या कागदी विजबिलांचे वितरण बंद करण्यात आले आहे. मात्र, मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे विजबील पाठविण्यात येत आहे. याशिवाय वेबसाईट व मोबाईल एपवर वीजबिल पाहण्यासाठी व भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत.

क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे विजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’चे उर्वरित व पर्याय आता निःशुल्क आहेत. नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी याआधी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क आहे.

तसेच ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील ग्राहकांनी विजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या ‘ऑनलाईन’ सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणने वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल अॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून ‘अन्ड्राईड’, ‘विंडोज’ व ‘आयओएस’ या आँपरेटींग सिस्टीममच्या मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड होईल अशी सुविधा आहे. महावितरणच्या  www.mahadiscom.in  या वेबसाईटसह गुगल प्लेस्टोर, अपल अप स्टोरमधून डाऊनलोड करण्याची सोय आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.