Pune: कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी जून 2020 च्या संचालन तूटपोटी 25 कोटी द्या, PMPMLची मागणी

Pune: Pay Rs 25 crore as operating deficit for June 2020, PMPML demands from municipal corporation

एमपीसी न्यूज- कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अदा करण्यासाठी जून 2020 च्या संचालन तुटीपोटी अग्रीम 25 कोटी रुपये दि. 5 जून पर्यंत ‘पीएमपीएमएल’ला देण्यात यावे, अशी मागणी सहव्यवस्थापकीय संचालक यांनी पुणे महापालिकेकडे पत्राद्वारे केली आहे.

शासन निर्णयानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) संचलनातून निर्माण झालेली आर्थिक तूट ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनी स्वतःच्या उत्पन्नातून भरून काढणे बंधनकारक केलेले आहे.

‘पीएमपीएमएल’ प्रवासी सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. सन 2019 – 2020 ची महामंडळाची एकूण संचालन तूट 307.98 कोटी रुपये अपेक्षित आहे. पुणे महापालिकेच्या 60 टक्के स्वामित्व हिश्यानुसार 184. 79 कोटी होत आहे.

महामंडळाचे संचलन सुरळीत चालण्यासाठी एप्रिल 2020 ते मार्च 2021 अखेर संचालन तुटीपोटी प्रतिमहा 15.40 कोटी रुपये अग्रीम प्राप्त होणे अपेक्षित आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महामंडळाचे संचालन सेवा, अत्यावश्यक सेवा वगळून बंद असलेले प्रवासी उत्पन्न नगण्यच आहे.

स्थायी समितीच्या ठरावानुसार प्रतिमहा 12.50 कोटी रुपये महामंडळाला प्राप्त झालेली नाही. जून 2020 ची संचलन तूट तातडीने मिळावी, असेही पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, ‘पीएमपीएमएल’च्या रोजंदारीवर काम करणाऱ्या 2169 कामगारांना पगार देण्यात आला नाही. यामध्ये कंड्क्टर, ड्रायव्हर, वर्कशॉपमध्ये काम करणारे सेवक आहेत.

त्यामुळे रोजंदारी पदावरील सेवकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये काही सेवक हे भाड्याच्या घरात राहतात. रोजंदारी पदावरील सेवकांचा पगार प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेस होतो.

परंतु, एप्रिल २०२० या कालावधीतील पगार अद्यापही अदा करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार हा पगार करणे आवश्यक असल्याचे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.