Pune : आरोग्य विभागात काम करणाऱ्या सेवकांना किमान वेतन त्वरित द्या – महापौर

Pay the minimum wage to the employees working in the health department immediately - Mayor

एमपीसी न्यूज – नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत पुणे महापालिका आरोग्य विभागात काम करणाऱ्या सेवकांना किमान वेतन अधिनियम 1948 व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या दुरुस्त्यांनुसार किमान वेतन देणाची कार्यवाही त्वरित सुरू करावी, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला लेखी पत्राद्वारे दिले.

पुणे शहरात कोरोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महापालिका अतिशय जबाबदारीने काम करीत आहे. अधिकाऱ्यांपासून ते अगदी सफाई सेवकांपर्यंत प्रत्येकजण आपल्या जीवाची पर्वा न करता या संकटाशी मुकाबला करत आहे.

पुणे महापालिकेने या कोरोना योद्धयांना सुरक्षा कवचही जाहीर केले आहे. तथापि, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत काम करणारे सेवक अतिशय तुटपुंज्या मानधनावर जोखमीचे काम करीत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची सर्वात जास्त शक्यता असलेल्या दवाखान्यांमध्ये बाधित रुग्णांची सेवा ते कोणतीही तक्रार अथवा सबब न सांगता करत आहेत.

प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या सेवकांना किमान वेतन देणे ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे महापौरांनी आदेशात म्हटले आहे. दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचे 5 हजार 851 रुग्ण झाले आहेत.

मे अखेरीस हा आकडा 6 हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. जूनमध्ये तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुणेकरांनी आतापासून काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.