Pune-PCMC Corona Comparative Status: पुण्यात 52 टक्के तर पिंपरीत 57 टक्के रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई!

Pune-PCMC Corona Comparative Status: 52% patients in Pune and 57% patients in Pimpri win Corona battle!

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दररोज कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येत वाढ होत असली तरी त्यापेक्षा जास्त वाढ कोरोनामुक्तांच्या संख्येमध्ये होत आहे. दोन्ही शहरांमध्ये कोरोनामुक्तांची संख्या ही सक्रिय कोरोना रुग्णांपेक्षा झपाट्याने पुढे जाताना दिसत आहे. पुणे शहरात कोरोना संसर्ग झालेल्यांपैकी 51.87 म्हणजेच जवळजवळ 52 टक्के रुग्णांनी आतापर्यंत कोरोनाची लढाई जिंकली आहे.  पिंपरी-चिंचवडमध्ये तर 57 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. या दोन्ही शहरांतील हे प्रमाण जग, भारत आणि महाराष्ट्रातील एकूण कोरोनामुक्तांच्या प्रमाणापेक्षा खूप चांगले आहे, हे फार मोठे आशादायक चित्र पहायला मिळत आहे.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व महाराष्ट्र, भारत व जागातील कोरोनाग्रस्तांची उपलब्ध माहिती यांचा तुलनात्मक अभ्यास ‘एमपीसी न्यूज’च्या टीमने केला. कोरोनाच्या लढाईत आपण, आपले शहर नेमके कुठे आहे, हे समजून घेण्यासाठी एमपीसी न्यूजच्या टीमने बनविलेला एका तुलात्मक आलेखही आम्ही या बातमीसोबत देत आहोत. त्यामुळे एकाच दृष्टीक्षेपात शहर ते जागतिक पातळीपर्यंतची कोरोनाची तुलनात्मक सद्यस्थिती दाखविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

कोणतीही तुलना आधी करताना सर्वांना समान पातळीवर आणणे आवश्यक असते. नुसत्या आकड्यांवरून तुलना करता येत नाही. त्यासाठी सर्व स्तरांवरील वेगवेगळे आकडे एका सूत्रात घालून प्रमाणाच्या म्हणजेच टक्केवारीची पातळीवर आणल्याने त्यांची तुलना संख्याशास्त्रीय पद्धतीने तुलना होऊ शकते.

तुलनेसाठी एकूण आकडेवारीपेक्षा प्रमाण हाच निकष 

ही तुलना करताना जगातील परिस्थिती, अमेरिका, रशिया, स्पेन, ब्राझील, इंग्लंड, इटली अशा देशांमधील परिस्थिती यात खूप फरक आहे, हे मान्य करावेच लागते. या प्रगत देशांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे त्यांचे सर्वच आकडे लाखांच्या घरात आहेत. तर पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये हेच आकडे दोन आकडी किंवा तीन आकडे आहेत.

त्यामुळे तुलना करताना कोरोनाबाधित शंभर रुग्णांपैकी किती बरे झाले, किती सक्रिय आहेत आणि किती जणांचा मृत्यू झाला, याचा अभ्यास करण्यात आला.

कोरोनाबाधितांचे आकडे देताना पहिल्या दिवसापासून आतापर्यंत एकूण कितीजणांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्याचे आकडे सांगितले जातात किंवा दाखविले जातात. प्रत्यक्षात त्यापैकी काही रुग्णांचा मृत्यू झालेला असतो किंवा ते बरे होऊन घरी गेलेले असतात. कोरोनाबाधित मृत आणि कोरोनामुक्त या दोघांची बेरीज करून ती मूळ कोरोनाबाधितांच्या संख्येतून वजा केली तर सक्रिय रुग्णांची संख्या येते. सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले कोरोनाचे रुग्ण म्हणजे सक्रिय रुग्ण समजले जातात.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये कोरोनामुक्तांची प्रमाण ही सक्रिय रुग्णांच्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे सोबतच्या तुलनात्मक आलेखावरून लक्षात येईल. त्यात हिरव्या रंगाचा स्तंभ कोरोनामुक्तांचे प्रमाण दर्शवितो, केशरी रंगाचा स्तंभ सक्रिय रुग्णांचे प्रमाण दर्शवितो तर लाल रंगाचा स्तंभ कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण दाखवतो.

प्रातिनिधीक चित्र

खात्रीशीर औषध उपलब्ध नसतानाही कोरोनामुक्तीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ

प्रथम आपण कोरोनामुक्तांचे तुलनात्मक प्रमाण पाहूयात! कोरोनामुक्तांचे प्रमाण जगामध्ये 39.75 टक्के, भारतात 40.55 टक्के तर राज्यात सर्वात कमी म्हणजे 26.26 टक्के इतके आहे. या तिन्हींपेक्षा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमाण जास्त आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी 51.87 म्हणजेच जवळजवळ 52 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये हे प्रमाण 57.02 टक्के असल्याचे दिसून येते.

जगात अजून कोरोनाप्रतिबंधक लस, कोरोनावरील खात्रीशीर औषध  किंवा कोरोना बरा करू शकेल अशी कोणतीही खात्रीशीर किंवा मान्यताप्राप्त उपचारपद्धती उपलब्ध नाही. तरी देखील निम्मे किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहे. रुग्णालयात असलेल्या सक्रिय रुग्णांपैकी 97 टक्के रुग्णांना सौम्य प्रकारचा आजार असून केवळ तीन टक्के रुग्णच गंभीर अथवा चिंताजनक अवस्थेत आहेत.

याचाच अर्थ सोप्या भाषेत सांगायचा झाला तर, कोरोना झाला म्हणजे सर्वकाही संपले असे नाही. कोरोना झाला तरी तुम्ही बरे होण्याची शक्यता 94 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आणि हे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या आकडेवारीवरून अधोरेखीत होत आहे.

प्रातिनिधीक चित्र

पुणे शहराचा कोरोना मृत्यूदर काळजी वाढविणारा

आता कोरोनाबाधित मृतांच्या तुलनात्मक प्रमाणाकडे बघूयात! कोरोनाबाधितांचा जागतिक मृत्यूदर 6.48 टक्के आहे. म्हणजेच कोरोनाची बाधा 100 जणांमागे साधारणतः साडेसहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण भारताचा विचार केला असता भारतातील मृत्यूदर जगाच्या मृत्यूदराच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. भारतात शंभर रुग्णांपैकी साधारणतः तीन रुग्णांचा मृत्यू होत आहे. महाराष्ट्रात मुंबईतील मृतांच्या संख्येमुळे मृत्यूदर देशाच्या सरासरीपेक्षा थोडा जास्त म्हणजे 3.53 टक्के आहे. पिंपरी-चिंचवड जग, महाराष्ट्र एवढेच नव्हे तर देशाच्या मृत्यूदरापेक्षाही कमी म्हणजे 2.9 टक्के इतका मृत्यूदर आहे.

पुणे शहराचे कोरोनामुक्तांचे प्रमाण हे जग, देश आणि महाराष्ट्रापेक्षा जास्त असले तरी मृत्यूदर हा पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र आणि देशापेक्षा खूप जास्त म्हणजे 5.67 टक्के इतका आहे. जगतिक कोरोना मृत्यूदरापेक्षा तो थोडा कमी आहे, एवढेच काय ते समाधान! पुणे शहरातील हे मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यात यश आले तर आपोआपच राज्याचा व देशाचा कोरोना मृत्यूदर आणखी कमी होण्यास हातभार लागू शकतो.

सक्रिय रुग्णांचे घटते प्रमाण आश्वासक

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण जग, देश आणि राज्याच्या तुलनेत खूपच आश्वासक आहे. जगात सध्या 53.77 टक्के सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. भारतात कोरोनामुक्तांचे प्रमाण पाऊण टक्क्याने जास्त असले तरी मृत्यूदर 3.42 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे त्यामुळे सक्रिय रुग्णांचे प्रमाण जगातिक सरासरी पेक्षा जास्त म्हणजे 56.39 टक्के इतके आहे. महाराष्ट्रात कोरोनामुक्तांच्या प्रमाणाबरोबरच  कोरोना मृत्यूदरही कमी असल्याने सक्रिय रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे तब्बल 70.21 टक्के असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे शहरात कोरोनामुक्तांचे प्रमाण आणि कोरोना मृत्यूदर दोन्ही जास्त असल्याने उरलेल्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण 42.46 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हेच प्रमाण सर्वात कमी म्हणजे 40.08 टक्के इतके कमी झाले आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण शून्यावर आणून आपले शहर, आपला जिल्हा, आपले राज्य, आपला देश व आपले जग कोरोनामुक्त करणे हेच सर्वांचे अंतिम ध्येय आहे.

युद्ध जिंकण्याची प्रभावी रणनीती अमलात आणण्याची गरज

कोरोनाची लढाई आपण जिंकू शकतो, हा आत्मविश्वास आता बळावू लागला आहे. कोरोनाबाधितांची अजूनही झपाट्याने वाढत असलेली संख्या रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याशिवाय तरणोपाय नाही. नवीन रुग्णांचे प्रमाण कमी करत ते शून्यावर आणणे, कोरोनामुक्तांचे प्रमाण आणखी वाढवत नेणे, कोरोना मृत्यूदर किमान पातळीवर आणणे आणि सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी करत करत ते शून्यावर आणावे लागणार आहे. या सर्व क्रिया एकाच वेळी केल्या तर आपले कोरोनामुक्त जगाचे, कोरोनामुक्त देशाचे, कोरोनामुक्त राज्याचे, कोरोनामुक्त जिल्ह्याचे आणि कोरोनामुक्त शहराचे ध्येय लवकर साध्य होणार आहे.

प्रत्येकाने काळजी घेण्याबरोबरच, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याबरोबरच, शासन,  प्रशासन व पोलीस यंत्रणा यांनी सक्षमपणे त्यांची जबाबदारी पार पाडली तर सर्वात मोठी जबाबदारी संशोधकांवर राहणार आहे. कोरोना प्रतिबंधक लस आणि कोरोनावर खात्रीशीर औषध आणि उपचारपद्धती विकसित करण्याचे मोठे आव्हान अजूनही बाकी आहे. त्यासाठी थोडा वेळही द्यावा लागणार आहे. तोपर्यंत कोरोना आपल्या सर्वांच्या बरोबर राहणार आहे. कोरोना बरोबर असतानाही आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जगण्याची कला आता प्रत्येकाला आत्मसात करावी लागणार आहे. अगदी कोरोना गेलाच नाही तरी तो आपले काहीही नुकसान करू शकणार नाही, अशी जीवनशैली प्रत्येकाला स्वीकारावी लागणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.