Pune News : बरसत्या जलधारांच्या साक्षीने हाती तिरंगा घेत पुणेकरांचा प्रभात फेरी सहभाग

एमपीसी न्यूज – ‘वंदे मातरम्, वंदे मातरम्’ … भारत माता की जय… हर घर तिरंगा’… अशा घोषणांमधून प्रकटणारी देशभक्तीची भावना.. युवक, महिला व लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या हाती असलेला तिरंगा…. देशभक्तीच्या भावनेला जोरदार पावसाच्या जलधारांनीही बरसत दिलेली साथ….अशा उत्साहाच्या वातावरणात पुणेकर नागरिकांनी पावसात उत्साहाने प्रभात फेरीमध्ये सहभाग नोंदवला. विधानभवन येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत या प्रभात फेरीचा समारोप झाला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपविभागीय अधिकारी हवेली आणि त्याअंतर्गत हवेली, पुणे शहर तहसील कार्यालय आणि पंचायत समिती पुणेच्या सहकार्याने बुधवारी सकाळी मामलेदार कचेरी येथून शुभारंभ झालेल्या प्रभात फेरीला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभात फेरीच्या मार्गावरील नागरिकही प्रभात फेरीत सहभागी होत गेल्याने रॅलीतील उत्साह वाढला.पावसातही हातात तिरंगा घेऊन नागरिक भारत मातेचा जयघोष करीत होते.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील, तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के यांच्यासह विभागाचे प्रमुख अधिकारी यांनी देखील प्रभात फेरीत सहभाग घेतला. विधानभवन येथे स्वातंत्र्य सैनिक हरिहर नाबर यांचा तसेच सरसेनापती पिलाजीराव जाधवराव यांचे वारस मंदाकिनी जाधवराव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणारांचे, क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

केंद्र तसेच राज्य शसनाच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विभागात देशभक्तीपर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले.

तहसीलदार कोलते पाटील यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रभात फेरीमध्ये सहभाग नोंदवत नागरिकांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली, असे त्यांनी सांगितले.

आद्य क्रांतीवीर हुतात्मा उमाजी नाईक स्मारकाला वंदन करून प्रभात फेरीचा शुभारंभ झाला. उमाजी नाईक स्मारक, राष्ट्र भूषण चौक, घोरपडे पेठ पोलीस चौकी, दलाल पान शॉप, महात्मा फुले स्मारक, लोहिया नगर, सोनावणे हॉस्पिटलमार्गे मल्लिकापासून पुढे जुना मोटर स्टँड, पद्मजी पोलिस चौकी, क्वार्टर गेट, शांताई हॉटेल, लाल देऊळ, जिल्हा परिषद नवीन, ब्लू नाईल हॉटेल मार्गे विधान भवन येथे प्रभातफेरीचा समारोप झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.