Pune : कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि  नागरिकांमधील दुवा म्हणून भूमिका बजावावी- मुख्यमंत्री

People's representatives should play a role as a link between the government and the citizens to control the corona - Chief Minister : कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यु दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे

एमपीसीन्यूज : कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यु दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

पुण्यातील विधान भवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत आज, गुरुवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार सर्वश्री गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती जाणून घेवून लोकप्रतिनिधीच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोविड 19 चा संसर्ग जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टिने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी.

कोरोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे.

राज्यात व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गरजेनुसार त्या-त्या भागात पुरवठा करण्यात येत आहे.

महापालिकांना कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्यात आली असून यापुढे ही मदत देण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स बनविण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार टास्क फोर्स निर्माण होत आहेत. यामुळे कोरोना उपाययोजनामध्ये सुसुत्रता येईल.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग यामध्ये एकसुत्रीपणा आणून सर्वांनी मिळून काम करावे, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

पुण्यात वाढत्या रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टिने बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे. यामध्ये महानगरपालिकेने पुढाकार घ्यायला हवा.

पुण्यासह नाशिक, औरंगाबाद महानगरपालिकांनीही बेडची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करुन त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी यासाठी राज्यशासन महापालिकांना आर्थिक मदत निश्चित देईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुण्यात उभारण्यात येणाऱ्या जम्बो रुग्णालयाचे काम गतीने करावे. संगणकीय प्रणालीमध्ये बेड व्यवस्थापन व अन्य आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. तसेच याचा आढावा वेळोवेळी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेने घ्यावा.

झोपडपट्टी परिसरात छोटी घरे असल्यामुळे याठिकाणी गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक अलगीकरणांवर भर द्यावा. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होवू नये यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.