Pune : अल्पदरात सुगंधी अत्तर, परफ्युम बनवण्याचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज- बाजारात मिळणाऱ्या स्वच्छतेचे लीक्वीड सोप आणि सुगंधी अत्तर, परफ्युमच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्राचार्य डॉ. सुधीर उजळंबकर यांनी घरच्या घरी अशी लीक्वीड सोप आणि सुगंधी अत्तर, परफ्युम अगदी अल्प दरात कशी बनवायची याचे प्रात्यक्षिक दाखवून सर्वांना अचंबित केले.

पर्यावरणशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, प्रो. एच. जे. अर्णीकर ट्रस्ट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रा. उजळंबकर यांनी विविध प्रकारचे लीक्वीड सोप आणि सुगंधी अत्तर, परफ्युम कशी बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले. विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, वसंत शिंदे, डॉ. नीलिमा राजूरकर, डॉ. सुजाता बरगाले, डॉ. रजनी पंचांग, संजय मा. क. आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. सुधीर उजळंबकर म्हणाले, दैनंदिन जीवनात आपण घरात लीक्वीड सोप आणि सुगंधी अत्तर, परफ्युम नेहमी वापरत असतो परन्तु याच्या किमती सर्वसामान्य माणसाला परवडत नाहीत त्यासाठी आपण घरच्या घरीच अशी लीक्वीड सोप आणि सुगंधी अत्तर, परफ्युम बनवून खर्चात बचत करू शकता तसेच आपल्याला याचा व्यवसाय करायचा असेल तर आपण करू शकता आणि चांगला नफा कमवू शकता. त्यासाठी आपल्याला फक्त परवाना काढणे आवश्यक आहे.

बाजारात १३२ प्रकारची अत्तरे तयार आहेत, त्यामध्ये गुलाब, केवडा फुलांचा वापर केला जातो. ८ ते १० मिमीचे अत्तर १५० रुपयापासून २००० रुपयापर्यंत मिळतात. ज्या फुलांचा सुगंध चांगला आहे, त्याला बाजारात जास्त मागणी आहे. हे सर्व शिकण्यासाठी कोणतीही पदवी लागत नाही. कोणीही ही लिक्विड तयार करू शकतात, असेही डॉ. सुधीर उजळंबकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. नीलिमा राजूरकर यांनी केले. डॉ. प्रमोद कांबळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.