Pune : ‘पुणे फोटो फेयर 2018 फेअर’ आखिल भारतीय व्हिडिओ फोटो प्रदर्शन 

एमपीसी न्यूज – कॅवॉक सर्विसेसतर्फे पुण्यात ‘पुणे फोटो फेयर २०१८’ या पाचव्या आखिल भारतीय विडिओ फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हे प्रदर्शन दि. २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी ११ ते ७ या वेळेत असणार आहे.

छायाचित्र आणि छायाचित्रण या विषयाशी निगडीत या प्रदर्शनामध्ये पुणे, मुंबई बरोबरच महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सोलापूर, बार्शी, नाशिक तसेच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, चेन्नई, बंगळूरु, केरळ इत्यादी ठिकाणचे छायाचित्रकार तसेच छायाचित्रण क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी होणार असल्याचे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील छायाचित्रकार संघांचा सहभाग आणि पाठिंबा या प्रदर्शनास असल्याचे पुणे फोटो फेयरचे अनिल जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी फोटोग्राफर्स फाऊंडेशन ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष प्रशांत पासलकर, पुणे फोटो विडिओ असोसिएशनचे अभय कापरे, चाकण फोटोग्राफर्स असोसिएशनचे दिलीप आगरकर व पुणे फोटोग्राफिक सोसायटीचे जीतु कोपर्डे व राजेश वाजे आदी उपस्थित होते.

देशी विदेशी ७० हून अधिक कंपन्यांनाची फोटोग्राफी व छायाचित्रण विषयीची सर्व साहित्य सामुग्री या प्रदर्शनामध्ये पहावयास मिळणार आहे. कॅमेरा विभागात सोनी निकॉन कॅनॉन पॅनासॉनिक आदी कंपनी चे कॅमेरे,  प्रिंटिंग विभागात कोनिका मिनॉलटा, एप्सन hp, कॅननचे प्रीन्टर्स, फोटो अल्बम विभागात विषयानुरूप गाणी असलेले, कुटुंबातील सदस्यांची नावे वापरून खास तयार करून घेतलेल्या गाण्यांचा समावेश असलेले अल्बम्स (वेडींग ऑडिओ अल्बम्स) असणार आहेत.  कॅननचे दोन प्रकारचे मिररलेस कॅमेरे पुणे फोटो फेअर मध्ये लाँच करण्यात येणार आहेत. फोटो व विडिओ कॅमेरा, फोटो एडिटिंगचे सॉफ्टवेअर व हार्डवेअर, इंस्टन्ट फोटो प्रिंटर, वीडियो मिक्सर, जिमिजीप, क्रेन्स, कॉपटर्स, ट्रायपॉड्स अशा किती तरी आधुनिक प्रणालींचा समावेश असलेल्या सामुग्री या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य ठरणार आहे.

प्रदर्शनाच्या ठिकाणी ‘मॉडेल फोटो शूट’, बेसिक छायाचित्रण तसेच अत्याधुनिक फोटो आणि विडिओ कॅमेर्‍याचा वापर, हाताळणी या विषयी कार्यशाळा तसेच चित्रिकरणाची अत्याधुनिक सामुग्री वापराविषयी प्रात्यक्षिके असणार आहेत. पुण्यातील ए एस बॉट्स या कम्पनी ने बनवलेला यंत्र मानव हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार असून या रोबॉटकडून फोटो काढून घेण्याची तसेच त्याच्याशी संवाद साधण्याची संधीही  या प्रदर्शनात मिळणार आहे. दर दोन तासांनी लकी ड्रा असून विविध बक्षिसे मिळवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रदर्शनास प्रवेश सर्वांना असून punephotofair.in या संकेतस्थळा वर नोंदणी केल्यास प्रवेशिका मोफत आहेत तर प्रदर्शनाच्या ठिकाणी माफक दरात प्रवेश दिला जाणार असल्याचं अनिल जैन यांनी परिषदेत सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.