Pune : ‘कोरेगाव भीमा’ला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले

शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन

एमपीसी न्यूज – कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारने 63 कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यात वाढ करून कोरेगाव भीमा विकास आराखडा 100 कोटींचा करण्यात यावा, तसेच विजयस्तंभ परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. या कामी केंद्र सरकारतर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल,” असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

मंगळवारी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केल्यानंतर आठवले पत्रकारांशी बोलत होते. विजयस्तंभाजवळ मराठा समाजाच्या सरपंचांकडून रामदास आठवले यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सहसचिव अविनाश महातेकर, केंद्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, केंद्रीय उपाध्यक्ष गंगाधर आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष भुपेश थुलकर, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळचे चेअरमन राजाभाऊ सरोदे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, रिपाई नेते परशुराम वाडेकर, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, कामगार आघाडीचे महेश शिंदे, महिला आघाडीच्या चंद्रकांता सोनकांबळे, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शहराध्यक्ष अशोक कांबळे, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड . आयुब शेख, शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, बसवराज गायकवाड, संजय सोनवणे, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यंदा 10 ते 15 लाख आंबेडकरी जनता आली असून, यावर्षी आंबेडकरी जनतेने तसेच मराठा समाजाने शांतता पाळल्याबद्दल दोन्ही समाजाचे आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने राज्यातील दलित आणि मराठा समाजाने एकत्र नांदावे. आज दाखविलेला सामाजिक सलोखा दोन्ही समाजाने कायम राखून सलोख्याने आणि बंधुतेने नांदावे.”

विजयस्तंभाजवळ रामदास आठवले अभिवादनासाठी उपस्थित असताना थोड्या वेळाने परिसरातील वीज गेली. अंधार पडल्याने सर्वत्र गोंधळ सुरू झाला. त्यावेळी रामदास आठवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. थोड्या वेळात पुन्हा वीज सुरू झाली. उडालेला गोंधळ शांत झाला. तत्पूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पेरणेफाटा येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून आलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिसरात झालेल्या गर्दीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. खुद्द रामदास आठवले हेही तीन ते चार तास या ट्रॅफिक जॅम मध्ये अडकले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.