Pimpri : पिंपरी-चिंचवड सहित पुणे शहरात कडकडीत बंद पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात (व्हिडिओ)

पुणे जिल्ह्यातील सात ठिकाणी इंटरनेट सेवा बंद

एमपीसी न्यूज- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर उर्से टोलनाक्याजवळ आंदोलकांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला आहे. त्यामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत द्रुतगतीमार्ग बंद राहण्याची शक्यता आहे.

तुरळक मार्गावर पीएमपीएमएलच्या बस धावत असून रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. निगडी प्राधिकरण आणि शहराच्या विविध भागातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. पुणे लोणावळा लोकल प्रवासावर याचा परिणाम झाला असून सकाळपासून लोकल सेवा सुरळीत सुरु आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिरूर, खेड, बारामती, जुन्नर, दौंड, मावळ, भोर तालुका या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सर्व नदी घाटांवर अग्निशमन दल आणि बचाव पथके आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. चाकण आंदोलनाची पुनरावृत्ती यावेळी न होण्यासाठी पोलिसांनी बाहेरून मोठा पोलीस बंदोबस्त मागविला आहे. आंदोलनात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उप आयुक्त कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करण्यात येणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मांडली.

आंदोलनात काही समाजकंटक घुसून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांवर पोलीस पळत ठेऊन आहेत. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व आंदोलकांनी देखील यासाठी सहकार्य करावे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येक चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातील बहुतांश भागातील पीएमपीएमएल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शिरूर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड आणि भोर तालुक्यातील इंटरनेट सेवा आज दुपारी चार वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, संपूर्ण शहरात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी आपली नित्याची कामे करावीत. तसेच आंदोलनासंदर्भात कोणताही मेसेज, माहिती सोशल मीडियावरून पाठवताना पुणे पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन पुणे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी ट्विटवरवरून केले आहे.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महत्वाच्या रस्त्यांवर तुरळक वाहने धावताना दिसून येत आहेत. वर्दळ कमी असली तरीही वाहतूक सुरळीत सुरु आहे. लक्ष्मी रास्ता, बाजीराव रस्त्यावरील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. स्वारगेट, शिवाजीनगर तसेच पिंपरीमधील वल्लभनगर बस स्थानकातून सोडण्यात येणाऱ्या बस आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे तीनही बस स्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. एरवी हिंजवडीच्या रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे कसरत असते मात्र आज या रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. या परिसरातही सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर अकरा ते एक या वेळात आंदोलन ठिय्या आंदोलन करणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद असून पुण्यात देखील त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. पुण्यातील काही मार्गांवर वाहतूक सुरू आहे मात्र दुकाने बंद असून अनुचित प्रकार घडू यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे.

बारामती येथे अजित पवार मराठा आंदोलनात सहभागी

एच ए कंपनी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

हिंदुस्थान अँटिबायोटोक्स (एच ए) कंपनीचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते एच ए कॉलनी पर्यंत मोर्चा काढण्यात आला.

डांगे चौक

मार्केट यार्डमध्ये भाजीपाल्याची आवक नाही

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. याचे पडसाद पुण्यातील मार्केट यार्ड येथे देखील पाहायला मिळत आहे. आज पुण्यातील मार्केट यार्डमध्ये भाजीपाल्याची आवक झालेली नसून मार्केट यार्डमध्ये चिटपाखरू सुद्धा दिसत नाही.

भोसरीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन

भोसरीच्या पीएमटी चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच अन्य संघटनांचे नेते पदाधिकारी सहभागी.

हिंजवडी येथील विप्रो चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन

हिंजवडी येथील विप्रो चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु विविध संघटनांचे नेते पदाधिकारी सहभागी झाले असून जोरदार घोषणाबाजी सुरु

हिंजवडी

निगडी प्राधिकरण

हिंजवडी रस्ता

स्वारगेट

बाजीराव रस्ता

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.