Pimpri News: पदवीधर निवडणूक! शहर भाजपचा फोलपणा उघडकीस तर राष्ट्रवादीने हुरळून जाऊ नये!

एमपीसी न्यूज – (गणेश यादव)  पुणे पदवीधर मतदारसंघात 20 वर्षानंतर भाजपच्या गडाला खिंडार पडले आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणे, पिंपरी-चिंचवडकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मतांचे दान टाकले आहे. त्यामुळे उच्चांकी मतदानाची नोंद करणा-या पिंपरी–चिंचवड शहर भाजपचा फोलपणा उघडकीस झाला.  हा मदारांचा महाविकास आघाडीच्या बाजुने दिलेला कौल असल्याने प्रचार यंत्रणेपासून अलिप्त राहणा-या शहर राष्ट्रवादी काँग्रेसने हूरळून जावू नये, असेच निकालावरुन म्हणता येईल.

पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख 22 हजार 145 अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपाच्या संग्राम देशमुख यांना 73 हजार 321  मते पडली आहेत. विजयासाठी एक लाख 15  हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. हा कोटा लाड यांनी पूर्ण केल्यामुळे त्यांचा विजय झाला आहे.

शहर भाजपने 18 हजार मतांची नोंदणी केल्याचा दावा केला होता. सर्वांत उच्चांकी नोंदणी केली असल्याचे सांगत कौतुक करून घेत होते. प्रत्यक्षात 18 हजार पैकी केवळ दहा हजार मतदान झाले. त्यातून लीड देखील भाजपला मिळू शकले नाही.  त्यामुळे भाजपचे हवेचे बुडबुडे ठरले आहेत. भाजपचा मतदार नोंदणीचा दावा किती फोल आणि बेगडी होता हे मतदानातून कळले. पुणे, पिंपरी-चिंचवड मधून भाजपला अपेक्षित लीड मिळाले नाही. मतपत्रिकेवर भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचे नाव तीन नंबरला होते. त्यांच्या रकाण्यासमोर मतदारांनी एकच्याऐवजी तीन नंबर लिहिले. चुकीचा प्रचार झाला. मतदान केले पण तिसरा क्रमांक लिहून आले, असे झालेल्या मतदानातून दिसून येते.

भाजपने कितीही दावा केला. तरी मतदारांनीच निवडणूक हातामध्ये घेतली होती. महाविकास आघाडीच्या पारड्यात मताचे दान टाकले. त्यामुळे भाजपचा फोलपणा उघडकीस आला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने हवेत जावू नये. मतदार नोंदणी केली नाही. काही केले नाही. अरुण लाड यांच्याबद्दल सहानुभूती होती. मागीलवेळी त्यांचा पराभव झाला होता. यावेळी त्यांना सहानुभूतीचा फायदा झाला आहे. सांगली, कोल्हापूर, साता-यात भाजप उमेदवार देशमुख यांच्याबाबत अपप्रचार बराच झाला. आणि हा पराभव देशमुखांचा असला तरी चंद्रकांत पाटील यांचाच आहे.

चंद्रकातदादा पाटील यांनी पिंपरी-चिंचवड पिंजून काढले. शैक्षणिक संस्था, बँका, पदवीधरांच्या बैठका घेतल्या. माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहरात आले.  महाविकास आघाडीला शॉक द्या म्हणाले. मात्र त्याचे रूपांतर भाजपच्या विजयात होऊ शकले नाही. त्यामुळे भाजपमधील नाराजी फसफसून वर आली आहे. शहर भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस होती. एकी दाखवत असले तरी बेकी आहे. त्याचे परिवर्तन पराभवात झाले. चंद्रकांतदादा, फडणवीस येवूनही भाजप उमेदवाराला मतदान झाले नाही.

प्रचारापासून ब्राह्मण समाज दूर?
पुणे पदवीधरमधून दोन टर्म चंद्रकांतदादा पाटील विजयी झाले.  तिसऱ्या टर्मल संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ब्राह्मण मतदारांची नाराजी ओढविल्याचे दिसून येत आहे. पदवीधरमध्ये ब्राह्मण समाजाचे प्राबल्य होते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दोन टर्म पदवीधरचे प्रतिनिधित्व केले होते. ब्राह्मण उमेदवार दिला नसल्याची नाराजी मतपत्रिकेतून उमटल्याचे दिसून येत आहे. पुण्यातून पण नाराजीचा सूर उमटला. भाजप प्रदेशाध्यक्ष, खासदार, सहा आमदार रणांगणात उतरुनही भाजपचा मानहानीकारक पराभव झाला आहे.

लाड यांच्या विजयात शहर राष्ट्रवादीचे फारसे योगदान नाही

राष्ट्रवादीचे अरुण लाड जिंकले असले. तरी त्यात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचे फारसे योगदान नाही. काही नेते प्रचार यंत्रणेपासून दूर होते. मतदार नोंदणी देखील केली नाही. यामुळे त्यांचा विजयात वाट नाही. त्यांनी हुरळून जावू नये. सुजाण मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे.  शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणाचे श्रेय नाही. अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे गेले होते. हे बोलके चित्र आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.