Pune, Pimpri: महापौर मुक्ता टिळक, राहुल जाधव यांना तीन महिने मुदतवाढीचे ‘गिफ्ट’

विधानसभा निवडणुकीमुळे महापौरांना तीन महिने मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

एमपीसी न्यूज – विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत राज्यातील ज्या महापालिकांमधील महापौर आणि उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे. या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहे. महापौरांना तीन महिने मुदतवाढ देण्यासह त्यासाठी अध्यादेश काढण्यास आज (मंगळवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि पिंपरीचे महापौर राहुल जाधव यांना तीन महिने मुदतवाढीचे ‘गिफ्ट’ मिळाले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल 14 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात येत होता. परंतु, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरांना तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. 14 डिसेंबरपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • राज्यात ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणूका प्रस्तावित आहेत. विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणूक पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत. यासाठी महापौर आणि उपमहापौरांच्या निवडणूका तात्पुरत्या तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

महापौर आणि उपमहापौर निवडणूक पुढे ढकलण्यासाठी महाराष्ट्र महापालिका (राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यांच्यामुळे विवक्षित महापालिकांचे महापौर व उपमहापौर पदांसाठीच्या) निवडणूका तात्पुरत्या पुढे ढकलणे अधिनियम- 2019 हा अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

  • दरम्यान, महापौरपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल 14 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात येत असलेल्या महापालिकांकडून नगरविकास खात्याने आरक्षणाची माहिती मागवून घेतली आहे. सन 2001 पासूनचा आरक्षणाचा तपशील महापालिकांनी नगरविकास खात्याकडे पाठविला होता. परंतु, आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीमुळे महापौरांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.