Pune/pimpri: महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांना उद्‌घाटनचा सोस; हॅरिस’च्या समांतर पुलाचे दोनदा उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना उद्‌घाटन करण्याचा सोस निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी दापोडीतील ‘हॅरिस’च्या समांतर पुलाचे दोनदा उद्‌घाटन केले. पिंपरीतील पदाधिकाऱ्यांनी सोमवारी तर पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच श्रेयवादाचे राजकारण रंगल्याचे दिसून आले.

बोपोडी सिग्नल चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हॅरीस पुलाला समातंर पूल बांधण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेने पुलाचा खर्च केला. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने संयुक्‍तरित्या हॅरिस पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर पूल बांधण्याचा प्रकल्प मे 2016 मध्ये हाती घेतला होता. या प्रकल्पाचा खर्च 22 कोटी 46 लाख रुपये झाला आहे. पुलाची लांबी 202 मीटर असून रुंदी 10.5 मीटर आहे. तसेच, पुण्याकडील पोच रस्त्याची 145 मीटर असून पिंपरीच्या दिशेची 65 मीटर आहे. पिंपरीकडून पुण्याच्या दिशेने जाणारा नवीन पूल 2 जुलै 2018 रोजी वाहतुकीला खुला करण्यात आला होता.

पुण्याकडून पिंपरीच्या दिशेने येणारा समांतर पूल सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुलाचे उद्‌घाटन करण्यात आले होते. पुणे महापालिकेने पुलासाठी पैसे दिले असतानाही त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते.

त्यानंतर पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पुन्हा पुलाचे उद्‌घाटन केले. पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोपोडीतील भाजपचे स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. दोन्ही महापालिकेतील एकाच पक्षाच्या असलेल्या सत्ताधा-यांनी पुलाचे दोनदा उदघाटन केले. यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले.

याबाबत बोलताना पिंपरी महापालिकेच्या बीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने म्हणाले, “पिंपरी महापालिकेने आमदार लक्ष्मण जगताप आणि महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते सोमवारी पुलाचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. पुणे महापालिकेने पुन्हा उद्‌घाटन केल्याबाबत कल्पना नाही”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.