Pune/Pimpri : पुण्यासह पिंपरी भागातही पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड!; अज्ञात व्यक्तींचा परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – पुण्यासह पिंपरी भागातही पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत. हि घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडल्या आहेत. यात दुचाकी, रिक्षा तीनचाकी आदी वाहनांचा समावेश आहे. अज्ञात व्यक्तींनी परिसरात दहशत माजवत कोयता, दगड आणि लाकडी दांडक्यांनी वाहनांची तोडफोड केल्याचं समजून येत आहे. या घटनेत अंदाजे 30 ते 35 वाहनांची तोडफोड करण्यात आली. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे, पुण्यात सहकारनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. याचबरोबर, पिंपरीतील थरमॅक्स चौक, अजंठा नगर येथेही सुमारे 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्यातील तळजाई वसाहत येथे शनिवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने दहशत माजवत रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. त्यांनी तीनचाकी रिक्षा, कार आणि अंदाजे 25 ते 30 दुचाकींची तोडफोड केली. यावेळी तोडफोड करत असताना हे टोळके जोरजोरात ओरडून दहशत माजवत होते. त्यामुळे भीतीपोटी नागरिक घराबाहेर येऊ शकले नाहीत. सुमारे अर्धा ते पाऊणतास हा प्रकार सुरु होता. त्यानंतर हे टोळके निघून गेले.त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच यातील संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

याचबरोबर, पिंपरी भागातील थरमॅक्स चौक, अजंठानगर येथेही अज्ञात व्यक्तींनी सुमारे 10 ते 12 वाहनांची तोडफोड करून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात सातत्याने वाहनांची तोडफोडीच्या घटना सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या घटनांमधून गुन्हेगारांवर नागरिकांचा कसलाही वचक राहिला नसल्याचे आढळत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांकडून पोलिसांवर टीका केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.