Pune : पियुष गोयल यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचा अवमान करणे दुर्दैवी -आनंद शर्मा

एमपीसी न्यूज – माजी पंतप्रधान, अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलेली टीका दुर्दैवी आहे. नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनीही भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. त्यांचाही भाजपच्या मंडळींनी अवमान केला. या सरकारला कोणाचा मानच ठेवायचा नाही, अशा शब्दांत राज्यसभेतील उपविरोधी पक्षनेते, खासदार आनंद शर्मा यांनी हल्लाबोल केला. डॉ. मनमोहन सिंग हे प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत. त्यांचा सल्ला घेण्यासाठी भाजपला काय कमीपणा वाटतो? ते विरोधी पक्षात असले तरी दुश्मन नाही, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी काँगेस भवन येथे आज दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, आमदार शरद रणपिसे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते गोपाळ तिवारी, अ‍ॅड. अभय छाजेड, रजनी पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील जमिनीवरील हकिकत मोदींना माहिती नाही. राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र मागे पडतो आहे. अर्थव्यवस्था बिकट आहे. मंदीचे सावट 2020 मध्ये आणखी गडद होणार आहे. ‘हौडी मोदीं’चा महाराष्ट्राशी काय संबंध? पुणे, मुंबईत आल्यावर मोदी हे 1 विझाबाबत का बोलले नाही, असा सवालही शर्मा यांनी उपस्थित केला. रुपयाची किंमत घसरतेय, कारखाने बंद पडत आहेत. तीन शिफ्टवरून आता 1 शिफ्टवर काम आले.

भाजपने दाखविलेले 5 ट्रीलीयन डॉलरचे स्वप्न हे प्रत्यक्षात येणे अवघड आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आरबीआयला काहीही सांगितले जात नाही. लोक मारतायेत. पण, यांना त्याचे काहीही गांभीर्य नाही. नोटबंदी, जीएसटीमुळे असंघटित क्षेत्र उध्वस्त झाल्याचा आरोपही शर्मा यांनी केला. पाच वर्षांत भाजपकडे खूप पैसा आला असून तो जगातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे.

महाराष्ट्रात आम्ही हार मानली नाही
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केवळ शरद पवारच प्रचार करताना दिसत आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी दिसत नाही. काँगेसने हार मानली का? असा सवाल केला असता या निवडणुकीत आम्ही हार मानली नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, खासदार राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, ज्योतिरादित्य सिंधिया असे दिग्गज नेते प्रचारात सहभागी झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.