Pune News : ‘पुणे प्लॉगेथॉन मेगा ड्राईव्ह’ची उत्साहात सुरुवात

एमपीसी न्यूज – स्वच्छता जनजागृती करण्यासाठी ‘पुणे प्लॉगेथॉन मेगा ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. निरोगी शरीर ठेवण्यासाठी सकाळी व्यायाम व फिरण्यासाठी बाहेर पडणा-या नागरिकांची जनजागृती याद्वारे करण्यात आली.

सकाळच्यावेळी बाहेर फिरताना हाताला लागेल तो कचरा गोळा करत परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात आला. पुणे महापालिकेच्या सहकार्याने आणि माय अर्थ फांउडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्री रोड ते पत्रकार भवन येथे ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ‘माझा कचरा-माझी जबाबदारी’, ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’च्या घोषणा देण्यात आला.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, शिवसेना शहरअध्यक्ष गजानन थरकुडे, संजय मोरे, माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे, ललित राठी, प्रतिक आल्हाट, सत्या नटराजन, प्रसाद चावरे, वैजयंती फाटे, आरोग्य विभागाचे अधिकारी सुहास पांढरे, बाळा गायकवाड, सनी घोडे, अभिजीत धुमाळ, नलिनी दोरगे, संजय साळवी, विशाल ओव्हाळ, सागर ढावरे, मनिष घरत, विजय घोलप, विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

दरम्यान, अभय छाजेड म्हणाले, वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दुषित हवा, पाण्यासोबत कच-याची समस्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. आपला परिसर आणि शहर स्वच्छ ठेवायचे असल्यास जागच्या जागी कच-याचे वर्गीकरण आणि विल्हेवाट लागली पाहिजे.

संजय मोरे म्हणाले, पुणे शहराची स्वछता व्हावी म्हणून प्रत्येक पुणेकरांनी खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे. सामाजिक संस्थांच्यावतीने शहरातील वलयांकित व्यक्तींचा सहभाग घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.

माय अर्थ फांउडेशनचे अनंत घरत म्हणाले, प्लॉगेथॉनच्या माध्यमातून शहरातील वस्तीभागात तसेच सोसायट्यामध्ये कच-याच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात पुणे शहराला प्रथम क्रमांक मिळावा यासाठी माय अर्थ फांउडेशन आणि इतर सामाजिक संस्थांच्या मदतीने अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे घरत म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.