Pune : वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर दंडाची रक्कम लगेच भरा, नाहीतर…….. !

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या फॉर्च्युनर चालकाकडून 24 हजाराचा दंड वसूल

एमपीसी न्यूज- वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर मोबाइलवर येणाऱ्या दंडाच्या पावतीकडे दुर्लक्ष करणे एका फॉर्च्युनर चालकाला चांगलेच महागात पडले आहे. सध्या पुणे शहरात सुरु असलेल्या नाकाबंदीमध्ये हे महाशय अलगदपणे वाहतूक पोलिसांच्या तावडीत सापडले आणि यापूर्वी केलेल्या सर्व गुन्ह्याचा लेखाजोखा समोर आला आणि त्याला एकाचवेळी 24 हजार 200 रुपयांचा दंड भरावा लागला.

पुण्यात सध्या पुणे शहर वाहतूक शाखेकडून ठिकठिकाणी नाकाबंदी सुरु करण्यात आली आहे. त्या अंतर्गत वाहनचालकांकडील दंडाच्या थकीत रकमेची तपासणी सुरु करण्यात आली आहे. आज, गुरुवारी दुपारी लष्कर वाहतूक विभागातील पोलीस हवालदार मार्तंड जगताप हे नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी करीत होते. त्यांनी एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाला अडवून त्याच्याकडून गाडीबाबत माहिती घेतली असता या चालकाने यापूर्वी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर तब्बल 24 वेळा वेग नियंत्रण मर्यादा ओलांडल्याचे निदर्शनास आले.

या गुन्ह्याबद्दल प्रत्येकी 1000 रुपये असा एकूण 24 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. परंतु या महाशयांनी मोबाइलवर आलेल्या पावतीकडे दुर्लक्ष करून दंडाची रक्कम भरलीच नाही. मात्र आज झालेल्या कारवाईत दंडाची थकीत सर्व रक्कम एकाचवेळी त्याच्याकडून वसूल करण्यात आली.

या कारवाईबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के वेंकटेशम यांनी हवालदार मार्तंड जगताप यांचे अभिनंदन केले आहे.  तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात टाळण्याचे त्यांनी आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.