Pune : विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडू इच्छिणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हाकला : सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज – दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत सुरू असलेल्या हिंसाचारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली पोलिसांना जबाबदार धरले असून, दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारचे असतात. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींवर अमानुषपणे लाठीमार करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी व विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडू, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमडळातून हाकला, अशी मागणी केली. एनआरसी आणि कॅब बिल तसेच दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात मशाल मोर्चा काढण्यात आला होता. खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या. 

विविध संघटनेतील विद्यार्थी शेकडो आणि इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील यात सहभागी होत या सर्व संपूर्ण घटनेचा निषेध केला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की आंदोलन करण्याचा आमचा जन्मसिद्ध अधिकार आम्हाला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिला असून आम्ही आमचा हा हक्क बजावणारच. आम्ही आंदोलन करणार आहोतच, जर पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आंदोलनकर्त्यांवर गोळ्या झाडाव्यात. ज्या मंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर आम्ही गोळ्या झाडू, असे विधान केले आहे, अशा मंत्र्याला पंतप्रधानांनी मंत्रिमंडळातून काढून टाकावे. आतापर्यंत हे होणे गरजेचे होते, मात्र दुर्दैवाने अद्यापपर्यंत अशी कारवाई झालेली नाही. या सर्व प्रकाराची जबाबदारी ही अंतिमतः गृहमंत्रालयाचीच असते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.