Pune : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी ‘पीएमपीएमएल’ बससेवा पूर्णपणे बंद -महापौर

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात आपण प्रवेश करतो की काय? अशी भीती मनात असताना लॉकडाऊन असूनही शहरांतर्गत वाहतूक सेवा देणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसची सेवा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट स्वारगेट येथील मुख्यालयात जाऊन बंद केली. यासंदर्भात महापौर मोहोळ यांनी विविध माध्यमातून पाठपुरावा करूनही सेवा सुरूच असल्याने त्यांनी पीएमपीएमएलचे मुख्यालय गाठून सेवा थांबवली. संध्याकाळी पाचनंतर एकही बस डेपोच्या बाहेर पडणार नसून केवळ अत्यावश्यक सेवेपुरत्याच बसेस उपलब्ध होणार आहेत.

महापौर मोहोळ यांनी मुख्यालय गाठून यावेळी अध्यक्षा नयना गुंडे यांना वस्तुस्थिती आणि नागरिकांच्या मागणीची माहिती देत सेवा बंद करण्याची सूचना केली. त्यावर महापौर मोहोळ यांनी केलेल्या सूचनेनुसार गुंडे यांनी निर्णय घेत सायंकाळी पाचपासून बस बंद करण्याचा निर्णय घेतला. यावेळी स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासणे, ‘पीएमपीएमएल’चे संचालक शंकर पवार हेही उपस्थित होते. पुणे शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेत बससेवा थांबवणे आवश्यकच होते. या निर्णयामुळे बाहेर पडणाऱ्या पुणेकरांवर लगाम बसणार आहे.

महापौर म्हणाले, पुण्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक असून, मी आधीपासूनच सार्वजनिक बससेवा बंद करण्यासाठी प्रयत्न करत होते. कोरोनाच्या आपण दुसऱ्या टप्प्यात असलो तरी तिसऱ्या टप्प्याची भीती आपल्या सर्वांसमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर वेळीच पावले उचलणे अपेक्षित आहेत. त्याचनुसार निर्णय घेऊन बससेवा बंद केली. बससेवा सुरू असणे म्हणजे नागरिकांना शहरात वापरण्यासाठी एक प्रकारचे प्रोत्साहनच होते’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.