Pune : महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर ‘पीएमपीएमएल’च्या बसेसची गर्दी; दररोज 250 बसेसची होतेय ये -जा

एमपीसी न्यूज – सुमारे 50 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या इमारतीसमोर ‘पीएमपीएमएल’ बसेसची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज 250 बसेसची या ठिकाणावरून ये – जा होत असते. त्यामुळे ही महापालिका इमारत आहे की ‘पीएमपीएमएल डेपो’ असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

या बसेस दुसरीकडे शिफ्ट करण्यात याव्या, अशी मागणी ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून या मागणीकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा असताना पदाधिकारी, नगरसेवकांची वाहने आतमध्ये घेताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो.

या बसेस कशाही आडव्या-तिडव्या वळतात. त्यामुळे वाहतुककोंडी होते. पादचाऱ्यांना पायी चालणेही अवघड होते. वारजे – माळवाडी, कोथरूड, बाणेर – बालेवाडी, आळंदी, भोसरी भागांत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसेस ये – जा करतात. दररोज सुमारे 250 बसेस ये – जा करतात.

या नवीन महापालिका इमारतीसमोरच मेट्रोची मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू आहे. भल्यामोठ्या मशीनच्या सहाय्याने खोल गड्ड्यात रात्रंदिवस खोदाई सुरू आहे. खळ्खळ् खळ्खळ् आवाज येत असल्याने पुणेकर वैतागले आहेत.

या बसेससाठी महापालिकेने पर्यायी जागा दिली नाही – सुनील गवळी, पीएमपीएमएल – व्यवस्थापक
पुणे महापालिकेसमोर दररोज 350 बसेसची पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागांत ये-जा होत असते. या बसेस दुसरीकडे उभ्या करण्यासाठी पुणे महापालिकेने पर्यायी जागा देणे आवश्यक आहे. ती दिलेली नाही, असे ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापक सुनील गवळी यांनी ‘एमपीसी न्यूज’ शी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like