सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pune : घरकामासाठी नोकर पुरविण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक करणा-या आरोपीस बेड्या

एमपीसी न्यूज – घरकामासाठी नोकर पुरविण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून ऑनलाईन हजारो रुपये घेऊन त्यांना नोकर न पुरवता त्यांची फसवणूक केली जात असे. अशा प्रकारे 30 ते 35 नागरिकांची फसवणूक करणा-या एकाला पुणे सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 4 मोबाईल फोन आणि एक डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहे.

विक्रम आत्तार सिंग (वय 32, रा. काळेपडळ, हडपसर. मूळ रा. भरतपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे राहणा-या भास्कर वसाने यांच्या नातवाला सांभाळण्यासाठी तसेच घर कामासाठी त्यांना एका सेविकेची गरज होती. त्याबाबत त्यांच्या हवाईदलात असणा-या मुलाने ऑनलाइन माहिती घेऊन रुद्रसाई इंटरप्राईजेस या एजन्सीशी संपर्क केला. एजन्सीकडून मुलाच्या व्हाट्सअपवर कागदपत्रे पाठवण्यात आली. या कागदपत्रांवरून तसेच नोकरीमध्ये सुट्टी मिळत नसल्यामुळे मुलाने संबंधित एजन्सीसोबत व्यवहार ठरवला. एजन्सीने सुरुवातीला एजन्सीच्या बँक खात्यावर 26 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार भास्कर यांनी एजन्सीच्या बँक खात्यावर 26 हजार रुपये जमा केले.

पैसे मिळाल्यानंतर देखील संबंधित एजन्सीकडून सेविका घरी आली नाही. त्यामुळे वृद्द दांपत्याने त्यांच्या मुलाला संपर्क केला. मुलाने एजन्सीला संपर्क केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. तसेच कालांतराने एजन्सीकडून वृद्ध दांपत्याचा नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात आला. त्यामुळे पैसे मिळून देखील एजन्सीकडून सेविका न देता भास्कर यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. तसेच पुणे सायबर सेलकडे तक्रार दिली.

हिंजवडी पोलिसांसोबत पुणे सायबर सेल समांतर तपास करत असताना सायबर सेलच्या पोलिसांनी कंपनीची माहिती काढली. त्यावरून ही कंपनी बनावट असल्याचे समजले. रुद्रसाई इंटरप्रायजेस या एजन्सीच्या नावाने सराईत आरोपी विक्रम आत्तार सिंग हा नागरिकांची फसवणूक करत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विक्रम गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अशाच प्रकारे 30 ते 35 लोकांची सुमारे 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे सांगितले.

या कारवाईमुळे बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील फसवणुकीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. न्यायालयाने आरोपीला 7 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून अन्य पीडितांच्या शोध सुरु आहे. मेड, घरकामासाठी नोकराची आवश्यकता असल्यास प्रत्यक्ष भेटून एजन्सीची पूर्ण चौकशी करून त्यांच्यासोबत व्यवहार करावा. तसेच आयडीबीआय बँक अकाउंट नंबर 0102102000027733, एचडीएफसी बँक अकाउंट नंबर 50100221379475, युनियन बँक अकाउंट नंबर 616901010050623, आयसीआयसीआय बँक अकाउंट नंबर 239201501049, तसेच मोबाईल नंबर 9822416200, 9673839202, 7620079011, 9607821257, 9579088939, 6387196849, 9689958281 याद्वारे कोणाची फसवणूक झाली असल्यास सायबर क्राईम सेल, पुणे शहर यांच्या संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

spot_img
Latest news
Related news