Pune Police : कोट्यवधींची जमीन लाटणाऱ्या सावकाराच्या त्वरित अटकेसाठी पीडित शेतकऱ्याचे पोलीस सहआयुक्तांना साकडे

एमपीसी न्यूज – आर्थिक अडचणीत असलेल्या मावळ तालुक्यातील एका शेतकऱ्याला काही रक्कम कर्जाऊ देऊन त्याची कोट्यवधी (Pune Police) रुपयांची शेतजमीन हडपणाऱ्या खासगी सावकार दाम्पत्याला तातडीने अटक करावी, या मागणीसाठी पीडित शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांनी पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले.

 

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्या समवेत पीडित शेतकरी चंद्रकांत चव्हाण, त्यांच्या कन्या अमृता देशमुख, सामाजित कार्यकर्ते महेश पवार, प्रसन्न चव्हाण यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यापुढे कैफियत मांडली. खासगी सावकार विजय पाचपुते व नीता पाचपुते या दाम्पत्याविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पावणेदोन वर्षे झाली तरी त्यांना अद्यापि अटक न झाल्याबद्दल, साधी चौकशीही न झाल्याबद्दल तसेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न झाल्याबद्दल नाईक यांनी आश्चर्य व्यक्त केले.

 

पीडित शेतकऱ्याकडून या प्रकरणाची सर्व माहिती घेतल्यानंतर सहआयुक्त कर्णिक यांनी त्यांना परिमंडल चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची भेट घेण्यास सांगितले. पवार यांच्या सूचनेनुसार पीडित शेतकरी कुटुंबाने तापस अधिकारी असलेले चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रणजित गायकवाड यांची भेट घेतली. या प्रकरणी लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस खात्याकडून पीडित शेतकरी कुटुंबाला देण्यात आले.

 

नेमकं काय प्रकरण आहे? – Pune Police 

 

अमृता देशमुख यांना काही रुपयांची थोड्या कालावधीसाठी तातडीची गरज होती. विजय पाचपुते हे व्याजावर पैसे देतात म्हणून देशमुख यांनी पाचपुते यांच्याकडून पैसे घेतले. दरम्यान हे पैसे देताना पाचपुते याने अमृता देशमुख यांचे वडील चंद्रकांत चव्हाण यांची स्वकष्टार्जित काही शेतजमीन तारण  मागितली. पैसे देताना सांगितले की, तारण म्हणून ठेवलेल्या जमिनीचा साठे करार करून तारण द्यावी लागेल. साठेकरार करताना सिक्युरिटी म्हणून वडील चंद्रकांत चव्हाण यांच्याकडून कुलमुखत्यारपत्र घेतले. कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या. तसेच चंद्रकांत चव्हाण व अमृता देशमुख  यांच्या कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या.

 

देशमुख यांनी पाचपुते यांची रक्कम ठरल्याप्रमाणे व्याजासह वेळेत परत केली. त्यानंतर चंद्रकांत चव्हाण यांची जमीन आणि सह्या करून घेतलेले स्टॅम्प पेपर, चेक परत मागितले. ते देण्यास पाचपुते यांनी टाळाटाळ केली. चव्हाण यांच्या जमिनीचा कुठलाही मोबदला न देता सदर जमीन विजय पाचपुते यांनी कुलमुखत्यारपत्राचा गैरफायदा घेऊन तळेगाव येथे नोंदणी न करता परस्पर स्वतःच्या बायकोच्या म्हणजे नीता पाचपुते यांच्या नावावर केली. त्याचे लोणावळा येथील नोंदणी उपनिबंधकांच्या कार्यालयात खरेदीखत केले.

 

त्यानंतर देशमुख यांनी दिलेल्या चेकवर रक्कम टाकून पाचपुते यांनी परस्पर बँकेत भरले व बाउन्स करून घेतले. चेक बाऊन्स झाल्याबाबत देशमुख यांच्यावर 138 कलम याप्रमाणे कोर्टात खटले सुरू केले. याची माहिती मिळाल्यानंतर देशमुख यांनी तलाठी कार्यालयात यासंबंधी सविस्तर अर्ज केला. त्यात ‘सदर जमिनीबाबत आम्हाला फसवण्यात आले आहे. जमिनीची कोणतीही रक्कम आम्हाला दिलेली नाही. हा सर्व गैरव्यवहार आहे’, असे तलाठी कार्यालयाच्या निदर्शनास आणून देत सदर जमिनीवर कुठलीही नोंद होऊ नये, यासाठी असलेली वस्तुस्थिती मांडण्यात आली.

 

दमदाटीने जमिनीचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न – Pune Police 

 

पाचपुते यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन त्यांच्या नावे करून घेतली. जमिनीवर आजही चंद्रकांत चव्हाण यांचा ताबा आहे. शेतकरी म्हणून तेच पीकपाणी घेत आहोत. विजय पाचपुते यांनी दमदाटीने त्या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी अनेक वेळा गुंड पाठवले.विजय पाचपुते व नीता पाचपुते यांनी पुण्याच्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतपेढीतून कर्ज घेऊन आम्हाला पैसे दिल्याचे दाखवले आहे. याच पतपेढीत पाचपुते यांचे बेनामी खाते आहे व त्याच बरोबर त्यांच्या नातलगांचेही खाते आहे. त्या पतपेढीतून खूप मोठी कर्ज घेतल्याचे कोर्टास दाखवले आहे. या पतपेढीतून पाचपुते दाम्पत्याने गेल्या 10-12 वर्षांत 17 ते 18 कोटी रुपयांचे व्यवहार केले आहेत.

 

भाईचंद हिराचंद रायसोनी ही पतपेढी दिवाळखोरीत असल्याने त्यावर चौकशी सुरू आहे. विजय पाचपुते व नीता पाचपुते यांच्या उत्पन्नापेक्षा खूप अधिक व्यवहार ते उभयता करत आहेत. प्रशासनाने पाचपुते यांच्या घरावर छापा मारला असताना तब्बल 40 मिनिटे नीता पाचपुते यांनी दरवाजा उघडला नाही. या दरम्यान बरेच दस्तऐवज गायब केल्याची आम्हाला माहिती मिळाली, हे पोलिसांना कळवून देखील त्याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही.

 

मनी लॉड्रिंग न्यायालयातही सिद्ध

 

पाचपुते यांनी चव्हाण व देशमुख यांच्यावर दाखल केलेल्या दोन खटल्यात पाचपुते दाम्पत्याने अवैध सावकारी म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग केली असल्याचे कोर्टाने स्पष्टपणे निकालपत्रात लिहिले आहे. त्या निकालाचा आधार घेत चव्हाण आणि देशमुख यांनी अनेक सरकारी खात्यात अर्ज केले.

Pune news: पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक डॉ. राहुल पाटील यांनी जिंकला हाफ आयर्नमॅनचा किताब

पाचपुते दाम्पत्य अवैध सावकारी करत असल्याने त्यांची व भाईचंद हिराचंद रायसोनी पतपेढी यांची चौकशी व्हावी, अशा मागणीसाठी सर्व घटनाक्रमासह अनेक सरकारी कार्यालयात, पोलीस स्टेशन, आयकर विभाग, आर्थिक गुन्हे अन्वेषण, ईडी कार्यालयात दिल्लीपर्यंत अर्ज केले, हेलपाटे मारले, परंतु घोर निराशा पदरी आली. ‘सरकारी अधिकारी व पोलीस माझ्या खिशात आहेत, गुंड माझ्याकडे नोकरीला आहेत’, असे विजय पाचपुते वारंवार बोलत असतो.

सहकार आयुक्त यांच्या कार्यालयात तक्रार अर्ज केला असता, उपनिबंधक दिग्विजय राठोड यांनी त्याची दखल घेतली व 22 जानेवारी 2021 रोजी पाचपुते दाम्पत्याच्या काही मालमत्तांवर छापे टाकले. सुमारे 10 ते 12 तास कारवाई सुरू होती. यात काही कोरे चेक, स्टॅम्प पेपर व अनेक दस्तावेज मिळाले. अनेकांना सावकारी पाशात अडकवल्याचे सिद्ध झाले आहे. उपनिबंधक राठोड व त्यांचे सहकारी यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व निस्पृहतेने कर्तव्य पार पाडून आमच्यासाठी आशेचा किरण जागा केला आहे.

पाचपुते दांपत्याने अवैध सावकारी करून गेल्या 12-14 वर्षात अनेक गोरगरिबांना फसवून करोडो रुपयांची मालमत्ता जमवली आहे. पाचपुते कुटुंब परदेशात पळून जाऊ शकते. यासाठी पाचपुते दाम्पत्याला त्वरित अटक करून याची सखोल चौकशी व्हावी, दंडात्मक कारवाई करावी व गोरगरिबांना न्याय मिळावा, अशी मागणी चव्हाण आणि देशमुख कुटुंबीयांनी केली.

पाचपुते दाम्पत्याने अशा प्रकारे जर कुणाला फसवले असेल तर त्यांनी न घाबरता न्यायालयात व संबंधित विभागात तात्काळ तक्रार करावी, असे आवाहन देखील चव्हाण व देशमुख कुटुंबीयांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.