सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pune : विशाखापट्टणम वरून मुंबईला गांजा घेऊन जाणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – विशाखापट्टणम ते वडोदरा या मार्गावरील रिटर्न ई पास काढून नारळाचे शहाळे वाहतूक करण्याच्या निमित्ताने गांजा घेऊन जाणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तिघांकडून 120 किलो गांजा, आलिशान कार आणि एक टेम्पो असा 34 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

समीर हसनाली शेख (वय 37, रा. जोगेश्वरी बांद्रा प्लॉट मुंबई), हिमायतउल्ला मोहम्मद अली शेख (वय 41, रा. अंधेरी वेस्ट मुंबई), अश्विन शिवाजी दानवे (वय 26, रा. अंधेरी मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक महाडिक यांना विशाखापट्टणम येथून मुंबईकडे काहीजण गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हडपसर टोलनाक्यावर सापळा लावला.

पहाटे चार वाजल्यापासून पोलिसांनी टोलनाक्यावर सापळा लावला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर एक संशयित स्कोडा कार (एम एच 04 / ई एफ 3514) आली.

पोलिसांनी कारला बाजूला घेऊन कारची झडती घेतली. त्यावेळी कारमध्ये 48 किलो गांजा सापडला. पोलिसांनी कार चालक समीर शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

पोलिसांच्या चौकशीत समीर याने एक टेम्पो (एम एच 02 / ई सी 0517) उर्वरित माल घेऊन मुंबईच्या दिशेने पुढे गेल्याचे सांगितले. त्यानुसार पुणे पोलिसांनी जिल्हा पोलिसांच्या मदतीने खालापूर टोल नाक्यावर सापळा लावला आणि टेम्पो ताब्यात घेतला.

टेम्पोमधून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि टेम्पोची झडती घेतली. पोलिसांना टेम्पोमध्ये नारळाचे शहाळे आणि त्याच्या खाली लपवलेला 72 किलो गांजा मिळाला.

पोलिसांनी 120 किलो गांजा, एक स्कोडा कार, एक टेम्पो, विशाखापटनम ते बडोदराचा रिटर्न ई पास, आंध्रप्रदेश पासिंग असलेली एक बनावट नंबर प्लेट असा एकूण 34 लाख रुपयांचा माल जप्त केला. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

spot_img
Latest news
Related news