Pune : प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा ‘संतोष माने’ होण्याची घटना टळली

एमपीसी न्यूज- प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पुण्यात पुन्हा एकदा संतोष माने होण्याची घटना टळली. शिवाजीनगर एसटी बसस्थानकात बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. साप्ताहिक सुट्टी असतानाही एका एसटी बस चालकाने मद्याच्या नशेत बस चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. या घटनेमुळे 2012 मध्ये पुण्यात घडलेल्या भीषण घटनेची आठवण समोर आली.

अमोल विठ्ठल चोले (वय 33, रा. ताडीवाला रोड) असे या बसचालकाचे नाव असून शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबतची माहिती अशी की, शिवाजीनगर एसटी बसस्थानकात बुधवारी रात्री प्रवाशांनी भरलेली पुणे उस्मानाबाद एसटी बस निघण्याच्या तयारीत होती. अचानक गणवेश न घातलेली एक व्यक्ती चालकाच्या जागेवर बसली आणि बस सुरू करून भरवेगात बस स्थानकाच्या बाहेर आणली. त्यावेळी कंडक्टर बसमध्ये नव्हता. त्यामुळे प्रवाशांनी आरडाओरड सुरु केली. बसमधील एका प्रवाशाने चालकाच्या केबिनमध्ये शिरून पहिले असता चालक मध्याच्या नशेत गाडी चालवत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्या प्रवाशाने बसचे स्टेअरिंग धरून चालकाला बस थांबवण्यास सांगितले असता. तो चालक बस थांबवून पळून जाऊ लागला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या चालकाचा पाठलाग करून त्याला शिवाजीनगर चौकामध्ये पकडले. याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अमोल चोले हा एसटी बसचा चालक असून त्याची साप्ताहिक सुट्टी होती. त्याला बीडला जायचे होते अशी माहिती पुढे आली आहे.

या घटनेमुळे 2012 मध्ये पुण्यात घडलेल्या भीषण घटनेची आठवण ताजी झाली. संतोष माने या एसटी बस चालकाने अशाच प्रकारे एसटी बस पळवून नेली होती. एक तास शहरात फिरवून धुमाकूळ घातला होता. या घटनेत 9 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 27 जण जखमी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.