Pune : ओएलएक्स द्वारे मोबाईल खरेदीच्या बहाण्याने चोऱ्या करणारा गजाआड

चोरट्याकडून सव्वादोन लाखांचे 8 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज – ओएलएक्स द्वारे मोबाईल खरेदीच्या बहाण्याने चोऱ्या करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून सव्वादोन लाख रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि.15) हडपसर परिसरात करण्यात आली.

मुशरफ बिलाल शेख (वय 20) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक इसम मोबाईल विक्रीसाठी हडपसर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हडपसर परिसरात सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेतले व त्याच्याकडून 2 लाख 20 हजार रुपये किमतीचे 8 महागडे मोबाईल जप्त केले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने ते मोबाईल चोरण्यासाठी ओएलएक्स या सोशल मीडिया चा वापर केल्याचे कबूल केले.

मुशरफ हा ओएलेक्स द्वारे महागडे मोबाईल विक्री करणाऱ्या लोकांशी संपर्क करत असे. आणि आपल्या बहिणीला मोबाईल घ्यायचा आहे असे सांगून मोबाईल विक्री करणाऱ्या लोकांना एखाद्या बिल्डिंगसमोर मोबाईल घेऊन बोलवत असे. मोबाईल मालकास तेथेच उभे करून मी माझ्या बहिणीला मोबाईल दाखवून आणतो असे सांगून तो मालकाची नजर चुकवून मोबाईल घेऊन पसार होत असे.

एवढेच नाही तर, गर्दीच्या ठिकाणी जाऊन लोकांच्या नजरा चुकवून त्यांच्या खिशातील मोबाईल चोरल्याचेही त्याने कबूल केले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने चोरलेल्या मोबाईल मालकांचा तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.