Pune : दहा लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या चिमुरड्याची 11 तासात सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज- दहा लाखाच्या खंडणीसाठी दोन वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या चिमुरड्याची 11 तासात सुखरूप सुटका केली. पुण्यातील वडाची वाडी येथून या चिमुरड्याचे अपहरण झाले होते. मात्र अपहरणकर्ते अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

पुष्कराज धनवडे असं या चिमुरड्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्कराज हा वडाची वाडी येथील घराच्या आवारात खेळत असताना अचानक गायब झाला. त्याच्या कुटुंबीयांनी बराचवेळ शोध घेऊन अखेर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनीही शोधाशोध सुरू केली. परंतु रात्री दीडपर्यंत पुष्कराज याचा कुठेही शोध लागला नाही.

पुष्कराज राहत असलेल्या बंगल्याच्या कंपाउंडमध्ये असलेल्या दत्त मंदिराच्या आवारात एका बिस्कीट पुड्याखाली एक चिट्ठी आढळली. या चिट्ठीत एक मोबाईल नंबर होता. या मोबाईल नंबरवर पुष्कराजच्या काकांनी फोन केला असता समोरच्या व्यक्तीने पुष्कराजचे अपहरण केल्याचे सांगत उद्या सकाळी 10 लाखाची खंडणी घेऊन नाशिकला या असे सांगण्यात आले.

त्यानंतर पोलीसांनी त्वरित आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी उंड्री परिसरातच असल्याची माहिती समोर आली. पुणे पोलिसांच्या 60 ते 70 कर्मचाऱ्यांनी संपूर्ण उंड्री परिसर पिंजून काढला. शनिवारी पहाटेच्या सुमारास परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या जागेवर पुष्कराज पोलिसांना आढळून आला. मात्र अपहरणकर्ते त्या ठिकाणी सापडले नाहीत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.