Pune Police : पुण्यात महिला पोलिसाकडून वीस लाखाची फसवणूक, काय आहे प्रकरण वाचा…

एमपीसी न्यूज – गुंतवणुकीचा अमिष दाखवून एका महिला पोलीस (Pune Police) आणि तिच्या पतीने एका व्यावसायिकाची तब्बल 19 लाख 50 हजार रुपयांनी फसवणूक केली. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सदाशिव नलावडे (वय 52) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार महिला पोलीस कर्मचारी ज्योती शंकर गायकवाड (वय 50) आणि तिचे पती शंकर लक्ष्मण गायकवाड (वय 54) या दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 मे 2021 ते 28 मार्च 2022 या कालावधीत घडला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नलावडे यांचा चार चाकी गाड्या दुरुस्तीचा व्यवसाय आहे. तर ज्योती गायकवाड या पुणे पोलीस दलात कामाला आहेत. आर्थिक गुणशाखेत त्यांची नेमणूक आहे. शंकर गायकवाड यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे. त्यामुळे गाड्या दुरुस्त करण्यासाठी गायकवाड आणि फिर्यादी नलावडे एकमेकांना अधून मधून भेटत होते. यातूनच त्यांची ओळख झाली. त्यानंतर गायकवाड यांनी 2019 मध्ये नलावडे यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवले पैशातून नवीन चार चाकी गाडी घेऊन कमी कालावधीत तुम्हाला 20 टक्के आर्थिक मोबदला देऊ असे देखील त्यांनी सांगितले होते.

ज्योती गायकवाड या पोलीस दलात काम करत असल्याने फिर्यादीने त्यांच्यावर ओळख ठेवून त्यांच्याकडे वेळोवेळी 19 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र फेब्रुवारी 2022 पासून आरोपी फिर्यादीला टाळू लागला.. तसेच त्यांनी कबूल केल्याप्रमाणे नवीन गाड्या घेतल्या नाहीत. यानंतर फिर्यादीने आरोपीच्या घरी जाऊन पैशाची मागणी केली तेव्हा त्याने चेक दिला. परंतु फिर्यादीला दिलेला चेक वटलाच नाही. त्यानंतर फिर्यादीने आरोपीला वकिलामार्फत नोटीस पाठवली परंतु आरोपी घराला कुलूप लावून निघून गेले होते. त्यांच्या दुकानावर (Pune Police) महिंद्रा बँकेची जप्तीची नोटीस लावल्याचे फिर्यादीला आढळले.
अखेर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तक्रार न दिल्याने शेवटी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर आता समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.