Pune : बॉक्स कमानींचा वाद चिघळणार, काँग्रेसने दिला आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज- गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असताना पोलीस व महापालिका प्रशासनाकडून गणेश मंडळांना बॉक्स कमानी बाबत परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी दोन दिवसात मंडळांना बॉक्स कमानी उभारण्याकरता परवानगी न दिल्यास महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला आहे.

नोटाबंदी, वाढती महागाई यामुळे गणेशोत्सव मंडळांकडे वर्गणी व निधीची कमतरता आहे. त्यामुळे किमान जाहिरातींच्या माध्यमातून तरी दिमाखदार उत्सव साजरा करता येईल असे कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजूनही कमानींकरता परवानगी देण्यात आलेली नाही.

गणेशोत्सवात जाहिरातदारांकडून जाहिरात घेऊन त्यातून मिळणाऱ्या निधीवर मंडळाचे अनेक खर्च अवलंबून असतात. यंदा अजूनही बॉक्स कमानींचा वाद सुरूच आहे. अनेक जाहिरातदारांशी बोलून मंडळांनी जाहिरातीकरिता रक्कम देखील घेतली आहे. परंतु परवानगी न मिळाल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून, पोलीस व महापालिका प्रशासनाने पुढील दोन दिवसात प्रत्येक मंडळाला किमान दोन तरी कमानी उभारण्याकरिता परवानगी द्यावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मोहन जोशी यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.