Pune: शहरात आज रात्री होणार ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची मोठी कारवाई – पोलीस आयुक्त

एमपीसी न्यूज – गेले काही दिवस दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे. या ३१ डिसेंबरला पुणे पोलीस रात्री १० ते (१ जानेवारीला) सकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण पुणे शहरात ड्रंकन ड्रायव्हिंग (डीडी) चाचण्या घेणार आहेत, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी नागरिकांना दिली आहे.

कारवाईबाबत अधिक माहिती देताना व्यंकटेशन म्हणाले की १३० पेक्षा जास्त ठिकाणी स्थिर, चलित आणि साध्या वेशातील पोलिसांचे गट चाचण्या घेतील. या संपूर्ण चाचण्यांचे छायाचित्रण आणि चलचित्रण केले जाईल. डीडी चाचण्यांमध्ये दोषी ठरलेली सर्व वाहने तिथल्या तिथे जप्त / ताब्यात घेतली जातील.

नवीन वर्षाची पार्टी करणाऱ्या सर्वांना डीडीपासून दूर राहाण्याची आम्ही विनंती करतो, असे आवाहन पोलीस आयुक्तांकडून पुणेकरांना करण्यात आले आहे. २०१९ मध्ये मद्यधुंद चालकांविरुद्ध अनेक केसेस झाल्या आहेत. तसेच दुर्दैवाने डीडीमुळे अनेक जीवघेणे अपघातही झाले आहेत.

डीडी डेटा हा नोकरीचे व्हेरिफिकेशन, व्हिसा आणि पासपोर्ट इ. शी जोडलेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना अशा प्रकरणात जर कारवाई झाली तर भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही आयुक्तांकडून देण्यात आला आहे. सर्व पुणेकरांना सुखी व सुरक्षित नववर्ष २०२० च्या हार्दिक शुभेच्छा, असेही आपल्या निवेदनात आयुक्तांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.