BNR-HDR-TOP-Mobile

Pune : भीमा कोरेगाव विजयदिनासाठी पोलीस प्रशासन सज्ज

एमपीसी न्यूज – मागील वर्षी 1 जानेवारी रोजी पेरणे येथील कोरेगाव भीमा विजय दिन या कार्यक्रमाच्या दरम्यान मोठा हिंसाचार घडला होता. मोठ्या प्रमाणावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. या अनुषंगाने यावर्षी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार पुन्हा घडू नये म्हणून मागील दोन महिन्यांपासून पोलीस प्रशासनाने जोरदार तयारी केलेली आहे.

यंदा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांना अत्यंत सुलभ सोईचे दर्शन व्यवस्था होईल याची प्रशासनाने सर्वतोपरी दक्षता घेतली आहे. 25 ॲम्बुलन्स, 5 कार्डियाक ॲम्बुलन्स, 20 किलोमीटर लांबीचे बॅरिकेडींग, 200 वॉटर टँकर, 300स्वच्छता गृहे , 23 फायर ब्रिगेड, 200 खासगी बसेस अशा विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच चारचाकी व दुचाकी वाहनांकरिता 11 वाहनतळ नव्याने बनवण्यात आले असून त्यामुळे 50000 वाहनांच्या पार्किंगची सुविधा केलेली आहे. ध्वनिक्षेपक यंत्रणा, विद्युत व्यवस्था आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या एस.टी .बसेसची सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी मदत कक्ष व पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलेले आहेत.

महिलांच्या मदतीसाठी महिला पोलीस पथके तैनात करण्यात आली असून मद्यपान करून वाहने चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. वृद्ध नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या मदतीसाठी पोलीस प्रशासनाकडून प्रातिनिधिक सेवा कर्मचाऱ्यांची पथके नेमण्यात आलेली आहेत. उपहारगृहाची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाकडून कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी 31 डिसेंबर रात्री दहा वाजता ते 1 जानेवारी 2019 रात्रीचे 12 पर्यंत ठिकठिकाणी वाहतूक वळवण्यात येणार आहे .

अहमदनगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकण येथे वळवण्यात येणार आहेत. अहमदनगर कडून हडपसर पुण्याकडे येणारी वाहने शिक्रापूर तळेगाव ढमढेरे, केडगाव, चौफुला सोलापूर हायवे मार्गे हडपसर पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून अहमदनगरकडे जाणारी वाहने चाकण मार्गे किंवा खराडी बायपास येथून हडपसर सोलापूर हायवे केडगाव चौफुला मार्गे अमदनगरकडे वळविण्यात येणार आहेत.

सर्व कार्यक्रमावर सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे नजर ठेवली जाणार आहे. तसेच सर्व कार्यक्रम शांततेत पार पडावा म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 1180 जणांवर विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागंरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस अधीक्षक 8 अप्पर पोलीस अधीक्षक, 31 पोलीस उपनिरीक्षक, 126 पोलीस निरीक्षक, 360 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच हजार पोलीस कर्मचारी राज्य राखीव दलाच्या एस आर पी एफ कंपनी तसेच कार्यक्रमाचे आयोजकांकडून आलेल्या 2 हजार सेवकांचा समावेश करण्यात आलेला आहे. एकूण बारा ठिकाणी चेक पोस्ट लावून नाकाबंदी द्वारे येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू करण्यात आलेली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3