Pune – गुजरातहून आलेला तब्बल साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवासाठी गुजरातहून पाठविण्यात आलेला तब्बल साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडला. ही कारवाई सोमवारी (दि.10) करण्यात आली. या प्रकरणी आराम बसच्या चालकांसह एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन जाधव हे सहकारनगर, धनकवडी भागात गस्त घालत असताना पद्मावती येथे खासगी आराम बसमधून भेसळयुक्त खवा विक्रीसाठी पुण्यात पाठविण्यात आला असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीची खात्री केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना या बाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम यांनी दिली. पद्मावती येथे खासगी आराम बसच्या थांब्याच्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला व गो-गंगा, भाग्यलक्ष्मी, वीरकृपा या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून तब्बल साडेतीन हजार किलो बनावट खवा जप्त करण्यात आला. या प्रकरणी खासगी आराम बसचा चालक तसेच बनावट खवा घेऊन आलेला भावेश पटेल यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, सचिन जाधव, इरफान मोमीन यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.