Pune : पुण्यात चालकावर आता ‘रोडिओ’ रोबोटची नजर ; वाहतुक नियमन करणाऱ्या रोबोटची चाचणी यशस्वी

एमपीसी न्यूज – वाहतूक पोलिसांचे काम हलके करण्यासाठी आणि आधुनिक पद्धतीने वाहतूक नियमन करण्यासाठी भविष्यात वापरात येईल अशा ‘रोडिओ’ रोबोटची आज मंगळवारी (दि.15) दुपारी 3 वाजता पुणे पोलीस आयुक्तालयात चाचणी यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे आता पुण्यात चालकावर सीसीटीव्हीनंतर रोबोटची नजर असणार आहे. या रोबोट चाचणीचे उदघाटन पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले.

सिग्नल लागल्यानंतर वाहनांना थांबण्याचा इशारा करणे, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करणे, झेब्रा क्रॉसिंग पाळण्यास सांगणे, आदी वाहतूक नियमानासाठी पुणे वाहतुक पोलिसांच्या मदतीसाठी रोबोट असणार आहे. त्यापूर्वी रोबोटच्या चाचणीला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी पुणे वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते या देखील उपस्थित होत्या. यावेळी पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम म्हणाले की, पुणे शहरातील काही रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर रोबोटच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण करण्यास मदत होणार आहे. त्याला प्रतिसाद पाहून इतर रस्त्यावर देखील रोबोटची व्यवस्था केली जाणार आहे. अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे पुणे शहर राज्यात एकमेव ठरल्याचे त्यांनी सांगितले. तर आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यानी ज्या पद्धतीने रोबोट तयार केला आहे. ही कौतुकाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.